“डीजेच्या वादात पडू नका, सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा”; मुख्यमंत्र्यांचे पुणेकरांना आवाहन

पुणे | दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत येणाऱ्या डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. पुण्यात आयोजित भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी पुणेकरांना डीजेच्या वादात न पडता संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे थेट आवाहन केले. पुण्यात नुकताच विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधातील लढा तीव्र केला असतानाच मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाच्या परंपरेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, “पुण्यात गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही, याबाबत मी पुणेकरांना सांगू इच्छितो की, पुण्यातच ती क्षमता आहे जी संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करू शकते. हे केवळ पुणेकरच करू शकतात. त्यामुळे या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, हे पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावे.”
हेही वाचा
“दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असं समजू नका”; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे मोठे वक्तव्य
दुसरीकडे, पुण्यात गणेशोत्सव आणि दहीहंडीदरम्यान डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात नागरिकांचे आंदोलन तीव्र होत आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनीही डीजेच्या अनिर्बंध वापराला कडाडून विरोध दर्शवला आहे. “रस्त्यावर धांगडधिंगा घातल्यानेच धार्मिकता सिद्ध होते हे मला मान्य नाही. मोठ्या आवाजाचा रुग्ण, गरोदर महिला व लहान मुलांना प्रचंड त्रास होतो. लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त हेतूने हा उत्सव सुरू केला, तो मूळ उद्देशच हरवला आहे; त्यामुळे मंडळांनी डीजे व स्पीकर्स टाळायला हवेत,” असे परखड मत त्यांनी मांडले.





