वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांशी हुज्जत घालत दमदाटी
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी थांबवले; “कमिश्नरला बोलवा!” म्हणत दमदाटीचा प्रयत्न

पुणे : पुण्याच्या वाकड परिसरात मद्यधुंद कारचालकाने पोलिसांशी हुज्जत घालत हायव्होल्टेज ड्रामा केल्याची घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने पोलिसांना शिवीगाळ करत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी संबंधित कारचालकाला थांबवले. मात्र, आपण मद्यपान केले असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही त्याने पोलिसांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – नागपुरातील १८ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; खबरदारी म्हणून आज शाळांना सुट्टी
“कमिश्नरला बोलवा!” म्हणत पोलिसांशी हुज्जत
कारचालकाने पोलिसांशी उद्धटपणे संवाद साधत “कमिश्नरला बोलवा!”, “इकडे बसा!”, “आता तुमच्या रिक्षात करीन!” अशा शब्दांत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, “तुम्ही लोकांनी काय केले? काय केले? काढले?” असे म्हणत त्याने पोलिसांशी वाद घातला.
या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
वाकड पोलिसांत गुन्हा दाखल
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यासह पोलिसांशी गैरवर्तन आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकाविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





