ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची राख सावडण्याची वेळ; शिल्पा गवारे प्रकरणात भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक!

१७ वर्षे संसारासाठी छळ सहन केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; “दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे!”

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा होत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र एका भावावर बहिणीची राख सावडण्याची वेळ आली. संतोष कलाटे यांच्या भगिनी शिल्पा गवारे यांच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले आहे. शिल्पा यांनी तब्बल १७ वर्षे संसार टिकवण्यासाठी जाच सहन केला, असा आरोप त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळामुळे अखेर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

चित्रा वाघ मैदानात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

या प्रकरणाची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर दखल घेतली असून त्या आक्रमक झाल्या आहेत. आज त्यांनी कलाटे कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. यावेळी आमदार शंकर जगताप आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. “एका महिलेला १७ वर्षे छळ सहन करावा लागतो आणि तरीही तिचे आयुष्य वाचवले जात नाही, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. शिल्पाला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. घरात सासू आणि जाऊ या दोन महिला असतानाही शिल्पावर कथित अत्याचार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महिलांनीच महिलेच्या वेदना समजून घेतल्या नाहीत, ही बाब समाजमनाला अस्वस्थ करणारी आहे.

हेही वाचा –  नागपुरातील १८ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; खबरदारी म्हणून आज शाळांना सुट्टी

राखी बांधायची होती… पण बहिणीची राख सावडावी लागली!

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याची आतुरतेने वाट पाहतो. मात्र कलाटे कुटुंबावर नियतीने असा घाला घातला की, ज्या दिवशी बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधायची होती, त्याच दिवशी भावांना बहिणीची राख सावडावी लागली. हा प्रसंग केवळ एका कुटुंबाचे दुःख नाही; तर महिलांच्या सुरक्षिततेबाबत समाजाला अंतर्मुख करणारा आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही प्रकरणाची दखल

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून त्यांनी कलाटे कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याचे सांगण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळावी आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. शिल्पा गवारे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, सक्षम सरकारी वकील उपलब्ध करून द्यावा आणि दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. “शिल्पाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा निर्धार कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्यांनी व्यक्त केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button