नागपुरातील १८ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; खबरदारी म्हणून आज शाळांना सुट्टी
धमकीच्या ई-मेलमध्ये ३१ ऑगस्टचा उल्लेख; शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नागपूर : नागपूर शहरातील १८ नामांकित शाळा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. धमकीच्या ई-मेलमध्ये ३१ ऑगस्ट या तारखेचा स्पष्ट उल्लेख असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज संबंधित शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्कता वाढवली असून शाळांच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१९ ऑगस्टला मिळाला संशयास्पद ई-मेल
नागपुरातील १८ प्रमुख शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला १९ ऑगस्ट रोजी संशयास्पद ई-मेल प्राप्त झाला होता. या ई-मेलमध्ये संबंधित इमारती बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, धमकीच्या ई-मेलमध्ये ३१ ऑगस्टचा उल्लेख करण्यात आल्याने आजच्या दिवशी शाळा प्रशासनाने विशेष खबरदारी घेत विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – राहुल गांधी अडचणीत? उत्तराखंडमध्ये विरोधी पक्षनेत्यांविरोधात एफआयआर दाखल
BDDS पथकाकडून तपासणी
धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व संबंधित शाळा आणि परिसराची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून (BDDS) कसून तपासणी केली. या तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह अथवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
प्राथमिक तपासात धमकीचा ई-मेल बांगलादेश आणि फ्रान्स येथून पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या ई-मेलमागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त
धमकीमध्ये नमूद केलेली तारीख आज असल्याने पोलिसांकडून कोणतीही जोखीम घेतली जात नाही. सर्व १८ शाळा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी पालक आणि नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.





