‘सरकारने शिक्षण-रोजगार दिला असता तर जरांगेंना आंदोलन करावं लागलं असतं का?’ अभिजीत दिपकेंचा सवाल
‘जरांगेंसोबत चर्चा करा, काही ना काही तोडगा काढा’; दिपके म्हणाले, ‘मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार मागत आहेत’

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर निशाणा साधला आहे.
‘सरकारने समाजाच्या मुलांना चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या संधी दिल्या असत्या, तर मनोज जरांगे सरांना आंदोलन करावे लागले असते का?’ असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला. राज्यातील अनेक समाज आणि घटक आज आंदोलन करत आहेत. ही परिस्थिती सरकारचे अपयश असल्याचेही त्यांनी म्हटले.
‘जरांगेंसोबत बसा, चर्चा करा’
मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित करत दिपके म्हणाले की, एखादी व्यक्ती आंदोलन करते तेव्हा तो तिच्यासाठी शेवटचा पर्याय असतो. सरकार एखाद्याला त्या टोकापर्यंत जाण्यास भाग पाडते.
‘सरकारने समाजाच्या मुलांना चांगले शिक्षण दिले असते आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असत्या, तर मनोज जरांगे सरांना आंदोलन करावे लागले असते का? हे सरकारचे अपयश आहे. आम्हाला आंदोलन करणे कुठे आवडते? सरकारने आमच्यासोबतही जंतर-मंतरवर 35 दिवस चर्चा केली नव्हती. 31 दिवसांनंतर सरकार आमच्याशी संवाद साधायला आले. मनोज जरांगे सरांसोबत असे करू नका. त्यांच्यासोबत बसा, चर्चा करा आणि काही ना काही तोडगा काढा,’ अशी विनंती दिपके यांनी सरकारला केली.
हेही वाचा – संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल
‘जरांगे पाटील काही चुकीचे मागत नाहीत’
मनोज जरांगे पाटील काही चुकीची मागणी करत नसल्याचे अभिजीत दिपके यांनी म्हटले. मराठा समाजातील मुलांना शिक्षणाचा आणि रोजगाराचा अधिकार मिळावा, यासाठी ते लढत आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘या दोन गोष्टींची गरज का निर्माण झाली? कारण सरकार या दोन्ही बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळेच आंदोलनाची वेळ आली आहे,’ अशी टीका दिपके यांनी केली.
आपण मनोज जरांगे पाटील यांची नक्की भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘ते दिल्लीपर्यंत आले होते, तर मीही इथपर्यंत जाऊ शकतो. मनोज जरांगे सरांना भेटायला मी नक्की जाईन,’ असे दिपके म्हणाले.
‘जंतर-मंतरपेक्षाही मोठे आंदोलन होणार’
यावेळी अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाचाही उल्लेख केला. बॉम्बे हायकोर्टाची टायपिंग परीक्षा रद्द करण्यात आली असून, ती पुन्हा घेण्याची मागणी मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे ज्या परीक्षा घेतल्या जातील, त्या परीक्षांमध्ये ज्या केंद्रांवर समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या केंद्रांवर परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली. विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी अद्याप मान्य झालेली नसल्याचे दिपके यांनी सांगितले.
‘कोर्टामुळे आम्हाला हे करता येत नाही, असे सरकार म्हणत होते. आम्ही कोर्टात जाण्यास तयार आहोत, तुम्ही फक्त यादी द्या. मात्र सरकार यादी देत नाही,’ असा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन उभे राहू शकते, असा दावा दिपके यांनी केला. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात कोणत्या ना कोणत्या मागणीसाठी आंदोलन सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.





