उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 270 प्रवाशांनी भरलेली फेरी बोट उलटली; 100 हून अधिक प्रवाशांची सुटका
किरेनिया-ताशुकचू मार्गावर समुद्रात शिरले पाणी; बोट उलटल्यानंतर बचावकार्य सुरू, जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. तब्बल 270 प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी फेरी बोट अचानक समुद्रात उलटल्याने खळबळ उडाली. किनाऱ्यापासून काही अंतरावर असताना बोटीमध्ये अचानक पाणी शिरू लागले. त्यानंतर बोटीचा तोल जाऊन ती समुद्रात उलटल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि बचाव पथके दाखल झाली असून, आतापर्यंत 100 हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कॅटामरान प्रकारची ही फेरी बोट उत्तर सायप्रसमधील किरेनिया बंदरातून तुर्कीच्या मेर्सिन प्रांतातील ताशुकचू बंदराच्या दिशेने निघाली होती. प्रवास सुरू केल्यानंतर बोट किनाऱ्यापासून सुमारे चार मैल अंतरावर गेली असताना त्यात अचानक पाणी शिरण्यास सुरुवात झाली.
बोटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यानंतर तिचा तोल गेला आणि ती समुद्रात उलटली. बोट उलटताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा – ‘सरकारने शिक्षण-रोजगार दिला असता तर जरांगेंना आंदोलन करावं लागलं असतं का?’ अभिजीत दिपकेंचा सवाल
उत्तर सायप्रसचे परिवहन मंत्री एर्हान अरिकली यांनी फेरी बोट उलटल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. आतापर्यंत 100 हून अधिक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, त्यांना किरेनिया येथे आणण्यात आले आहे.
उत्तर सायप्रसच्या आरोग्य मंत्रालयानेही आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जखमी किंवा गरज असलेल्या प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, दुर्घटनेनंतर किरेनिया आणि ताशुकचू या महत्त्वाच्या फेरी मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या मार्गावर अनेक कंपन्या फेरी सेवा चालवतात. मात्र, दुर्घटनाग्रस्त बोट नेमकी कोणत्या कंपनीच्या मालकीची आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
या दुर्घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, समुद्रात उलटलेली फेरी आणि घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याचे दृश्य दिसत आहे. बचाव पथकांकडून प्रवाशांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू असून, दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठीही तपास केला जाणार आहे.





