भारत-उझबेकिस्तानमध्ये मोठा करार; दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्यावर सहमती, 2030 पर्यंत 5 अब्ज डॉलर व्यापाराचे लक्ष्य
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव्ह यांच्यात ताश्कंदमध्ये उच्चस्तरीय बैठक; अणुऊर्जेसह संरक्षण, खाणकाम, डिजिटल तंत्रज्ञान आणि दुर्मिळ खनिजांमध्ये सहकार्य वाढणार

ताश्कंद : भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्यात ताश्कंद येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत नागरी अणुऊर्जेसाठी दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्यासह डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण, खाणकाम आणि दुर्मिळ खनिजे अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली. तसेच 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 5 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय उझबेकिस्तान दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय तसेच प्रादेशिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. व्यापार, पायाभूत सुविधा, संरक्षण आणि सुरक्षा, इनोव्हेशन, कृषी, औषधनिर्माण, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान तसेच UPIसह डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील सहकार्याचा आढावा घेण्यात आला.
दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा
भारतातील नागरी अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा उझबेकिस्तानकडून करण्याचा मार्ग सुकर करण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले. भारताच्या वाढत्या अणुऊर्जा क्षमतेच्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा मानला जात आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि उझबेकिस्तानमधील धोरणात्मक भागीदारीला 15 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी सहकार्याला नवी दिशा दिली जात आहे. यासाठी परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर ‘समन्वय परिषद’ स्थापन करण्यात येणार असून, संयुक्त आयोगाचा दर्जा सचिव स्तरावरून थेट मंत्री स्तरावर वाढवण्यात येणार आहे.
हेही वाचा – अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेसाठी अशी असेल टीम इंडिया? पाहा संभाव्य प्लेइंग-११
विविध क्षेत्रांत सामंजस्य करार
मोदी-मिर्झियोयेव्ह यांच्या बैठकीनंतर खाणकाम, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि आयुर्वेद यांसह विविध क्षेत्रांतील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
उझबेकिस्तानमधील ‘फयाज तेपा’ आणि ‘कारा तेपा’ या बौद्ध वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करण्यासाठीही दोन्ही देशांमध्ये सहकार्य करार झाला आहे. त्यामुळे भारत-उझबेकिस्तानमधील सांस्कृतिक संबंधांनाही नवी दिशा मिळणार आहे.
पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान
दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑलीय दरजाली दोस्तलिक’ प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 36 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘दोस्तलिक’ या शब्दाचा अर्थ मैत्री असा होतो. हा सन्मान भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक आणि दृढ मैत्रीचे प्रतीक आहे. हा केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ताश्कंदमध्ये योग प्रात्यक्षिकाला उपस्थिती
पंतप्रधान मोदी यांनी ताश्कंदमधील ‘यांगी उझबेकिस्तान’ स्मारकाला भेट देत पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी त्यांनी तेथे आयोजित विशेष योग प्रात्यक्षिक कार्यक्रमालाही उपस्थिती लावली.
उझबेकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे भारताच्या मध्य आशियातील वाढत्या सहभागाच्या दृष्टीने मोदींचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.





