शहरीकरण ही समस्या नव्हे, विकासाची मोठी संधी; महाराष्ट्रात १०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; तिसरी-चौथी मुंबई, धारावी पुनर्विकासातून नागरी विकासाला गती देणार

मुंबई : शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता नियोजनबद्ध, शाश्वत आणि नागरिककेंद्रित शहरांची निर्मिती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई येथे आयोजित तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे (वर्ल्ड मेयर्स फोरम) उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री उमेश राय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक जयराज पाठक यांच्यासह देश-विदेशातील महापौर, नगरप्रशासक आणि शहरी विकास क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारतात पूर्वी शहरीकरणाला समस्या मानून ते रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शहरीकरण रोखता आले नाही आणि त्याचे योग्य नियोजनही झाले नाही. त्यामुळे अनियोजित शहरे, झोपडपट्ट्या, अपुऱ्या नागरी सुविधा, पाणीटंचाई आणि कचरा व्यवस्थापनासारख्या समस्या निर्माण झाल्या. २०१४ नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याची भूमिका मांडली. त्यानंतर देशातील शहरी प्रशासन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली.
तिसरी आणि चौथी मुंबई विकसित करणार
महाराष्ट्राच्या भविष्यातील शहरी विकासाचे चित्र मांडताना फडणवीस यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईच्या निर्मितीचा उल्लेख केला. नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत असून, येथे एज्यु-सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडि-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सिटी उभारण्यात येणार आहेत. शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय सेवा, नवोपक्रम आणि जागतिक कंपन्यांसाठी स्वतंत्र परिसंस्था निर्माण करण्याचे नियोजन आहे. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांची क्षमता असलेली शैक्षणिक व्यवस्था आणि १२ जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी सात विद्यापीठांनी कामकाज सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
विरार ते वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित करण्यात येत आहे. वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर उभारले जात असून, त्याला जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बुलेट ट्रेन आणि सुपर एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून हा परिसर मुंबईशी जोडण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत पायाभूत सुविधा क्षेत्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा – राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक
अटल सेतूमुळे प्रवासाचा वेळ कमी
अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ परिसरातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. २२ किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूमुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत सुमारे ४० मिनिटांत पोहोचता येते. पुढील वर्षी हा प्रवास ३० मिनिटांत पूर्ण करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. विद्यमान शहरांचे पुनरुज्जीवन आणि पुनर्विकास करण्यासोबतच नव्या शहरांची निर्मिती अशा दुहेरी धोरणातून राज्य नागरी विकासाला गती देत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये मोठे परिवर्तन होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात शहरांचा वाटा ६५ टक्के आहे. महाराष्ट्राची ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या सुमारे ४०० शहरांमध्ये, तर उर्वरित लोकसंख्या सुमारे ४० हजार गावांमध्ये राहते. त्यामुळे शहरांमध्ये उत्तम राहणीमान निर्माण करून राज्यातील निम्म्या लोकसंख्येच्या जीवनमानात सुधारणा करण्याची मोठी संधी आहे, असे त्यांनी सांगितले.
शहरांच्या विकासासाठी केवळ मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता नसते, तर इच्छाशक्ती, ठाम निर्धार आणि योग्य नियोजनही महत्त्वाचे असते. जागतिक स्तरावर गुंतवणुकीसाठी भांडवल उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी व्यवहार्य आणि दर्जेदार प्रकल्प तयार असणे आवश्यक आहे. प्रकल्पांचे योग्य नियोजन केल्यास गुंतवणूक आकर्षित होते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
धारावीचे नव्या व्यावसायिक केंद्रात रूपांतर
मुंबईतील जुन्या वस्त्या आणि इमारतींचे पुनरुज्जीवन, पुनर्विकास आणि नागरी परिवर्तन सुरू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवाशांना सर्व सुविधांनी युक्त सन्मानजनक घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या मुंबईचे प्रमुख व्यावसायिक केंद्र असलेल्या बीकेसीला भविष्यात धारावीच्या रूपाने आणखी एका महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्राची जोड मिळेल. पुढील दहा वर्षांत धारावी मुंबईचे नवे व्यावसायिक केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
महापौर हे नागरिकांचे पहिले उत्तरदायी प्रतिनिधी
आपण स्वतः नागपूरचे महापौर म्हणून काम केले असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजातील आव्हानांची जाणीव असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता किंवा अन्य नागरी सुविधांबाबत समस्या निर्माण झाल्यास ते सर्वप्रथम महापौर किंवा नगरसेवकांकडे अपेक्षेने पाहतात. त्यामुळे महापौरांचे काम अत्यंत आव्हानात्मक असून त्यांना चोवीस तास सज्ज राहावे लागते, असे ते म्हणाले.
प्रत्येक शहराने दुसऱ्या शहरातील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करावी. इंदूर, अहमदाबाद आणि मुंबई यांसारख्या शहरांतील चांगल्या कार्यपद्धतींचा इतर शहरांना उपयोग होऊ शकतो. प्रत्येक वेळी नव्याने प्रयोग करण्याऐवजी यशस्वी मॉडेलचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने शंभर वर्षांत शहरी प्रशासन, प्रशिक्षण, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी आणि धोरणनिर्मितीमध्ये दिलेल्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले. जागतिक महापौर परिषदेत होणाऱ्या चर्चांमधून आणि निष्कर्षांमधून मिळणाऱ्या सूचना महाराष्ट्र शासनाला सादर कराव्यात. त्यावर सकारात्मक विचार करून आवश्यक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी देशभरातील यशस्वी नागरी उपक्रम आणि उत्तम कार्यपद्धतींचे संकलन असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू आणि महापौर रितू तावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. जयराज पाठक यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनाची भूमिका आणि संस्थेच्या कार्याची माहिती दिली.




