Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

FSSAI New Rule: पॅकेज्ड फूडमध्ये साखर, मीठ की फॅट जास्त? आता लाल षटकोनी चिन्हातून मिळणार स्पष्ट इशारा!

पॅकेज फूड आणि ड्रिंक्सवर ‘HIGH SUGAR’, ‘HIGH SALT’ आणि ‘HIGH FAT’ चेतावणी देण्याचा प्रस्ताव; ग्राहकांना खरेदीपूर्वीच मिळणार महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : पॅकेज्ड खाद्यपदार्थ आणि पेयांचे सेवन करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एखाद्या पॅकेज्ड फूड किंवा ड्रिंकमध्ये साखर, मीठ किंवा फॅटचे प्रमाण जास्त असल्यास त्याची माहिती ग्राहकांना पॅकेजवरच स्पष्टपणे मिळणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) यासाठी पॅकेजच्या पुढील भागावर लाल षटकोनी (Red Hexagon) चिन्हाद्वारे चेतावणी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

नव्या प्रस्तावानुसार संबंधित खाद्यपदार्थांच्या पॅकेजवर ‘HIGH SUGAR’, ‘HIGH SALT’ किंवा ‘HIGH FAT’ अशी स्पष्ट चेतावणी देण्यात येणार आहे. ही माहिती नियमित पोषणमूल्यांच्या तक्त्यापेक्षा मोठ्या अक्षरात आणि ग्राहकांचे त्वरित लक्ष वेधून घेईल अशा पद्धतीने दर्शवण्याचा प्रस्ताव आहे.

सर्वोच्च न्यायालयात FSSAIकडून माहिती

FSSAIने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अनुपालन प्रतिज्ञापत्रात या प्रस्तावाची माहिती दिली आहे. ‘3S And Our Health Society’ या संस्थेने खाद्यपदार्थांवर फ्रंट-ऑफ-पॅक चेतावणी लेबल अनिवार्य करण्याची मागणी करत जनहित याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणाच्या १३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने FSSAIला या विषयावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर FSSAIने न्यायालयात आपले अनुपालन प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

लाल षटकोनी चिन्हातून मिळणार इशारा

नव्या नियमांची अंमलबजावणी झाल्यास पॅकेज्ड खाद्यपदार्थाच्या समोरच्या भागावर लाल षटकोनी चिन्हामध्ये संबंधित पोषक घटकाचे प्रमाण जास्त असल्याची माहिती दिली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना पॅकेजच्या मागील बाजूवरील पोषणमूल्यांचा तक्ता बारकाईने वाचण्याची गरज न पडता उत्पादनाबाबत प्राथमिक माहिती सहज मिळू शकणार आहे.

विशेषतः ‘HIGH SUGAR’, ‘HIGH SALT’ आणि ‘HIGH FAT’ अशा स्पष्ट शब्दांमुळे ग्राहकांना उत्पादनाची निवड करताना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –  सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्याला दिलासा मिळणार?

नियम टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा प्रस्ताव

FSSAIने हे नियम टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, प्रत्येक खाद्यपदार्थावर ही चेतावणी लावली जाणार नाही. काही एकघटक पदार्थांना या नियमातून वगळण्याचा प्रस्ताव आहे.

यामध्ये तूप, खाद्यतेल, मीठ, साखर, गूळ आणि मध यांसारख्या एकाच घटकापासून बनलेल्या आवश्यक पदार्थांचा समावेश आहे.

ग्राहकांना खरेदीपूर्वीच मिळणार माहिती

नवे नियम लागू झाल्यास पॅकेज्ड फूड आणि ड्रिंक्समध्ये साखर, मीठ किंवा फॅटचे प्रमाण जास्त आहे की नाही, हे ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वीच सहज समजू शकणार आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची निवड करताना ग्राहकांना अधिक पारदर्शक आणि स्पष्ट माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.

मात्र, प्रस्तावित नियमांची अंतिम अंमलबजावणी कशी आणि कधी होणार, याबाबत FSSAIच्या अंतिम निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button