नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी; ‘आपला कुंभ’ यशस्वी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार
सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही; साधुग्रामसाठी अडीच हजार कोटींची तरतूद, ‘कुंभ दूत’ उपक्रमालाही सुरुवात

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी लक्षात घेऊन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विकासकामांना वेग देण्यात आला आहे. सर्व संबंधित यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असून, सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्व कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, पणन मंत्री जयकुमार रावल, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, साधू-संत आणि अधिकारी उपस्थित होते.
साधुग्रामसाठी अडीच हजार कोटींचा महत्त्वपूर्ण निर्णय
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये कायमस्वरूपी आणि दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. साधुग्रामची जागा सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च करून कायमस्वरूपी अधिग्रहीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या जागेचा भविष्यातही कुंभमेळ्यासाठी उपयोग व्हावा, यासाठी तिची योग्य पद्धतीने व्यवस्था केली जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी रस्ते, पायाभूत सुविधा आणि भाविकांसाठी आवश्यक नागरी सुविधांचा विकास करण्यात येत आहे.
साधुग्रामच्या जागांबाबत नागरिक किंवा शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या संवेदनशीलतेने सोडवण्यात येतील. आवश्यक सुधारणा करून संबंधितांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्यामुळे दीर्घकालीन विकासाला चालना
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या खर्चातून नाशिक, त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्ह्यात दीर्घकालीन पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याने नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शासन आणि प्रशासनाला याची जाणीव असून, कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना या सुविधांचा मोठा लाभ मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे. सुरक्षित, सुव्यवस्थित, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय संस्कृतीचा मोठा आविष्कार
भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असून, महाकुंभ हा भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेचा मोठा आविष्कार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून देशभरातील विविध भक्ती परंपरांचा संगम नाशिकमध्ये अनुभवता येणार आहे.
पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत, राजस्थानपासून गुजरातपर्यंत तसेच ईशान्य भारतातील विविध भागांतील भक्ती परंपरांचे दर्शन या सोहळ्यात घडणार आहे. ‘भक्ती संगम’च्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात झाली असून ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण होणार आहे. साधू-संतांचे आशीर्वाद आणि नागरिकांच्या सहकार्याने सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला
‘हा शासनाचा नव्हे, प्रत्येक नाशिककरांचा कुंभ’
पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक परंपरा नसून भारताची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा जगासमोर मांडणारा महत्त्वपूर्ण सोहळा असल्याचे सांगितले.
‘हा शासनाचा नव्हे, तर प्रत्येक नाशिककरांचा कुंभ आहे,’ असे सांगत त्यांनी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी या आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन केले. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा देशासाठी आदर्श ठरावा, यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनाही विशेष महत्त्व
देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक, साधू-संत आणि पर्यटक नाशिकमध्ये येणार असल्याने कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख व्यापक स्तरावर पोहोचवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कुंभमेळा हा केवळ नदीकाठी होणारा धार्मिक उत्सव नसून भारताची विचारपरंपरा, अध्यात्म, संतपरंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्याचा सोहळा आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, संगीत आणि कलात्मक कार्यक्रमांनाही महत्त्व देण्यात येत आहे. याच उद्देशाने तीन दिवसीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘कुंभ दूत’ उपक्रमाची सुरुवात
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक आयोजनासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवकांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणातर्फे ‘कुंभ दूत’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यांना नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना गर्दी व्यवस्थापन, स्वयंसेवा, समन्वय, शिस्त आणि नागरिकांशी संवाद यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
भविष्यातील सिंहस्थच्या नियोजन आणि आयोजनात या विद्यार्थ्यांचे योगदान अधिक प्रभावीपणे घेण्यासाठी ‘कुंभ दूत’ उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सिंहस्थ सहाय्यक समितीची पुस्तिका, संकेतस्थळ आणि ॲपचे उद्घाटन
कार्यक्रमादरम्यान सिंहस्थ सहाय्यक समितीची पुस्तिका, संकेतस्थळ आणि ॲपचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘आपला कुंभपर्व, माझी जबाबदारी’ ही प्रतिज्ञाही घेण्यात आली.
कार्यक्रमास आमदार किशोर दराडे, गोकुळ गिते, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, डॉ. सदानंद मोरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, साधू-संत, महंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





