मनोज जरांगे पुन्हा उपोषणावर; ५८ लाख कुणबी नोंदींच्या मागणीवर ठाम, सरकारसोबत आज निर्णायक चर्चा?
आज सकाळी १० वाजता उपोषणाला सुरुवात; जरांगे यांचे हे ११वे उपोषण, सरकारकडून नोंदी आणि प्रमाणपत्रांबाबत आकडेवारी जाहीर

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्व पात्र मराठा समाजबांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच जात पडताळणीमध्ये नाकारण्यात आलेली प्रमाणपत्रेही द्यावीत, या मागण्यांसाठी जरांगे शनिवारी, २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू करणार आहेत. सकाळी १० वाजता उपोषणाला सुरुवात होणार असून, हे आपले ‘अंतिम लढा’ असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. हे त्यांचे ११वे उपोषण आहे.
जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडूनही हालचालींना वेग आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले असून, त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उपोषणादरम्यान जरांगे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. केवळ ०.३ टक्के नोंदी नाकारण्यात आल्या असून, ज्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे, असा दावा त्यांनी केला.
ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत आणि सरकारने निश्चित केलेल्या नियमावलीनुसार आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्यांनी पुढील आठ दिवसांत आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. अशा अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
जरांगे यांच्या काही दाखल्यांबाबतच्या आक्षेपांवरही जात पडताळणी समितीच्या सदस्यांनी पुनर्विचार करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. काही प्रकरणे उच्च न्यायालयात गेल्याने ती न्यायालयीन बाब असल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी; ‘आपला कुंभ’ यशस्वी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार
१४ लाखांहून अधिक जणांना प्रमाणपत्रे; सरकारची आकडेवारी
सरकारने जरांगे पाटील यांना दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्टपर्यंत १४ लाख ३१ हजार ६३४ जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यापैकी १४ लाख २४ हजार ६३४ जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
राज्यात सध्या केवळ १,७४७ अर्ज प्रलंबित असून, ५,२४८ अर्ज नामंजूर करण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे प्रत्येक पात्र व्यक्तीला प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत.
सरकारकडे अर्जच येत नसल्याचे संबंधित अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे नोंदी उपलब्ध असलेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
अंतरवाली सराटीत उपोषणाची मोठी तयारी
दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मराठा संघटनांकडून मोठी तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते आंदोलनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून तब्बल एक हजार रिक्षांची रॅली काढण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो कार्यकर्ते रिक्षांमधून शनिवारी अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत.
एकाच वेळी मोठ्या संख्येने रिक्षा अंतरवाली सराटीच्या दिशेने निघणार असल्याने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जरांगे-सरकार चर्चेकडे लक्ष
५८ लाख कुणबी नोंदी, प्रमाणपत्रांचे वाटप आणि जात पडताळणीमध्ये नाकारलेल्या प्रमाणपत्रांचा मुद्दा यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला सरकारकडून प्रमाणपत्र वाटपाची आकडेवारी आणि अर्ज करण्याचे आवाहन केले जात असताना दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आणि सरकारमध्ये होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





