Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आशिष शेलारांच्या खांद्यावर ई-स्पोर्ट्सची मोठी जबाबदारी; ESGFच्या अध्यक्षपदी निवड

देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवड; ई-स्पोर्ट्सला करिअर आणि रोजगाराचे क्षेत्र बनवण्याचा निर्धार

मुंबई : “ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन” (ESGF)च्या अध्यक्षपदाची जबाबदारी इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारली आहे. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या फेडरेशनच्या सर्वसाधारण बैठकीत शेलार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांनी ई-स्पोर्ट्स क्षेत्राला अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच तरुणांसाठी रोजगार आणि करिअरच्या संधी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ई-स्पोर्ट्सला केवळ मनोरंजन न ठेवता करिअरचे क्षेत्र बनवणार

शेलार म्हणाले की, युवा पिढीतील डिजिटल कौशल्यांना योग्य व्यासपीठ देणे आवश्यक आहे. ई-स्पोर्ट्सकडे केवळ मनोरंजन किंवा गेमिंग म्हणून न पाहता कौशल्य, शिस्त, प्रशिक्षण आणि करिअरची संधी असलेले क्षेत्र म्हणून त्याचा विकास करण्याचे आव्हान आपण स्वीकारत आहोत.

मैदानी खेळांप्रमाणेच ई-स्पोर्ट्समध्येही गुणवत्तापूर्ण खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी विविध राज्यांच्या फेडरेशनशी समन्वय साधून केंद्र सरकारशी आवश्यक संवाद साधला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  भंडाऱ्यातील आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीची पाहणी; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे सुविधांवर लक्ष

भारतामध्ये ५२ कोटी गेमर्स; ई-स्पोर्ट्सची मोठी बाजारपेठ

ESGF ही देशातील ई-स्पोर्ट्सच्या विकासासाठी कार्यरत महत्त्वाची संस्था आहे. भारतात ई-स्पोर्ट्स आणि गेमिंग क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असून, देशात सुमारे ५२ कोटी गेमर्स असल्याचे फेडरेशनने सांगितले. त्यापैकी दररोज सुमारे ११ कोटी खेळाडू गेमिंगमध्ये सहभागी होतात. विविध खेळांच्या सुमारे २८ प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असून, हे गेम पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या सुमारे ८ ते ९ कोटी असल्याचेही सांगण्यात आले.

क्रिकेटप्रमाणे ई-स्पोर्ट्समध्येही संरचित व्यवस्था

क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी यांसारख्या पारंपरिक खेळांमध्ये राष्ट्रीय संघ, निवड प्रक्रिया, स्पर्धा, प्रशिक्षण, नियम आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वाची ठोस व्यवस्था आहे. त्याच धर्तीवर ई-स्पोर्ट्समध्येही शिस्तबद्ध आणि संरचित व्यवस्था उभारण्याचे काम ESGF करत आहे.

विविध मैदानी खेळांच्या फेडरेशन आणि संघटनांवर काम करण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या आशिष शेलार यांच्या नेतृत्वामुळे ई-स्पोर्ट्स क्षेत्राला नवी दिशा आणि चालना मिळेल, असा विश्वास फेडरेशनने व्यक्त केला आहे. तरुणांच्या डिजिटल कौशल्यांना योग्य संधी देत ई-स्पोर्ट्सला भविष्यातील रोजगार आणि करिअरचे प्रभावी क्षेत्र बनवण्याचे आव्हान आता ESGFसमोर असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button