‘मुंबईवर मराठ्यांचा महाप्रलय येणार’; जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, ‘मागे हटणार नाही’
अंतरवली सराटीत पुन्हा उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा निर्धार, सरकारला निर्णयासाठी वेळ देणार असल्याचे स्पष्ट

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवली सराटी येथे आजपासून त्यांनी उपोषण सुरू केले असून, हे आपले शेवटचे आंदोलन असल्याचा दावा केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी पुन्हा एकदा दिला आहे. ‘मुंबईत आंदोलन करणारच, वर्षावर जाऊन बसणार’, असा निर्धार जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला निर्णय घेण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून वेळ दिला जाणार आहे. मात्र, सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करेल. ‘जरा थांबा, दम धरा; बघा कशी लाट उसळते. मराठा आंदोलकांचा महाप्रलय येणार आहे,’ असा इशाराही त्यांनी दिला.
‘मुंबईतील नागरिकांना त्रास होऊ नये’
मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करतानाच जरांगे यांनी मुंबईकरांना त्रास होऊ नये, अशी भूमिकाही मांडली. मुंबईतील मराठी आणि ओबीसी समाजातील नागरिक आपलेच आहेत, असे सांगत त्यांनी आंदोलनादरम्यान सामान्य नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये, असे स्पष्ट केले.
‘मुंबईतील लोकांना वाटले पाहिजे की मराठी आडमुठे नाहीत; सरकार आडमुठेपणाची भूमिका घेत आहे,’ असे जरांगे म्हणाले. सरकारने वेळेत निर्णय घेतला तर मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘आरक्षण दिलं तर मुंबईत येणार नाही’
सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर मुंबईत आंदोलन करण्याचा प्रश्नच नाही. मात्र, आरक्षण दिले नाही तर मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असा दावा जरांगे यांनी केला. मुंबई बंद पडली किंवा परिस्थिती गंभीर झाली तरी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन सुरू असून, आता हे अंतिम आंदोलन असल्याचे सांगत जरांगे म्हणाले की, मराठा समाजाची ताकद सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांना दाखवून दिली जाईल. समाजातील तरुण आणि पुढील पिढीला मोठे करणे, हेच आपले स्वप्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – ‘मराठी ब्युटी’चा जलवा! ‘मांजर’मधील भन्नाट पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला
‘आमच्या पोरांना हात लावून दाखवा’
आंदोलनातील कार्यकर्त्यांवर कारवाई केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जरांगे यांनी दिला. ‘आमच्या पोरांपैकी एकालाही हात काय, नुसतं बोट लावून तर दाखवा,’ असे म्हणत त्यांनी सरकार आणि राजकीय नेत्यांवर टीका केली. राज्यातील तसेच विविध पक्षांतील नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
छगन भुजबळांवरही निशाणा
यावेळी जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. तहसीलदार आणि संबंधित अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणपत्र देत असताना जात पडताळणी समित्यांची भूमिका काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इतर राज्यांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था नसल्याचा दावा करत ‘तहसीलदार सक्षम नाहीत का?’ असा प्रश्न जरांगे यांनी केला. जात पडताळणी समित्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतला. मराठा आरक्षणाच्या मागणीसह कुणबी प्रमाणपत्रे आणि नाकारलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.





