TOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

मालिका जिंकली, पण क्लीन स्वीप हुकला! कोलंबो कसोटीनंतर कोच गंभीरची पोस्ट तुफान व्हायरल

कोलंबो कसोटी अनिर्णित, पण भारताने मालिका १-० ने जिंकली; गंभीर यांच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटी अत्यंत नाट्यमय वळणावर अनिर्णित संपली. मात्र, पहिल्या कसोटीतील विजयाच्या जोरावर भारतीय संघाने दोन सामन्यांची मालिका १-० अशा फरकाने जिंकली. भारताने या सामन्यात पहिल्या डावात २१३ धावांची आघाडी घेत श्रीलंकेवर फॉलोऑन लादला होता. त्यामुळे भारत २-० असा निर्भेळ मालिका विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशा याने झुंजार शतकी खेळी करत भारताचा विजय रोखला.

सामना संपल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दोन्ही संघांच्या कामगिरीचे कौतुक करणारी सोशल मीडिया पोस्ट केली. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये चारित्र्य, संयम आणि मानसिक ताकदीचे महत्त्व अधोरेखित करत भारतीय खेळाडूंच्या पाच दिवसांच्या लढाऊ खेळाचे कौतुक केले. त्याचबरोबर सोनल दिनुशाच्या असामान्य आणि अविश्वसनीय कामगिरीचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

हेही वाचा –  मुंढेंच्या FDAचा मुंबईत पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’; चार अन्न आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित

भारताच्या विजयाच्या मार्गात भक्कम भिंतीसारखा उभा राहिलेल्या दिनुशाने पहिल्या डावात १०३ धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात फॉलोऑननंतरही त्याने नाबाद शतकी खेळी साकारत श्रीलंकेला पराभवापासून वाचवले. विरोधी संघातील खेळाडूच्या उत्कृष्ट कामगिरीचे गौतम गंभीर यांनी खुलेपणाने कौतुक केल्याने त्यांच्या खिलाडूवृत्तीची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली आहे.

गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने एकतर्फी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. कोलंबो कसोटीत भारताने पहिल्या डावात ९ बाद ५०३ धावा उभारल्या, तर श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांत संपुष्टात आला. भारताने मोठी आघाडी घेत फॉलोऑन दिल्यानंतरही श्रीलंकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात संयमी खेळ केला.

सोनल दिनुशाच्या झुंजार फलंदाजीसह तळातील फलंदाजांनी दाखवलेल्या संयमामुळे श्रीलंका सामना वाचवण्यात यशस्वी ठरला. अखेर कोलंबो कसोटी अनिर्णित राहिली, मात्र भारताने दोन सामन्यांची मालिका १-० ने जिंकत ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button