बाप्पाच्या आगमनासाठी मुंबई सज्ज! चिंचपोकळी-लालबागमध्ये कडेकोट बंदोबस्त; हजारो पोलिसांचा पहारा
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित; परळमधील अलीकडच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस विशेष सतर्क

मुंबई : वर्षभर ज्या सणाची भाविक आतुरतेने वाट पाहतात, तो गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांची जोरदार तयारी सुरू असून, उद्या विविध मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन सोहळे पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर चिंचपोकळी आणि लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
चिंचपोकळीच्या प्रसिद्ध चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी विशेष सुरक्षा नियोजन केले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वाहतूक सुरळीत राखणे आणि कोणताही अनुचित प्रकार टाळणे, यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.
परळ परिसरात नुकत्याच घडलेल्या हिंसक झटापटीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. चिंतामणीच्या आगमन सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी ८०० ते १,००० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मुंबई पोलिसांसोबतच रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांचाही बंदोबस्तात सहभाग असणार आहे. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि परिसरातील सुरक्षेवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी हा मुंबईतील जुन्या आणि प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना १९२० मध्ये करण्यात आली. त्यामुळे यंदा या मंडळाच्या दीर्घ परंपरेचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – मालिका जिंकली, पण क्लीन स्वीप हुकला! कोलंबो कसोटीनंतर कोच गंभीरची पोस्ट तुफान व्हायरल
चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला दरवर्षी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित राहतात. बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी मुंबईसह आसपासच्या भागांतूनही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदाही मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री परळ परिसरात दोन गटांमध्ये हिंसक झटापट झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तीन जणांसह काही अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असताना वादाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. त्यानंतर सुमारे ५० ते ६० दुचाकीस्वार आणि ३० ते ४० युवकांमध्ये वादावादी झाली. पुढे या वादाचे रूप हाणामारी आणि दगडफेकीत झाले. या घटनेत काही तरुणांसह पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.
पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या घटनेनंतर परळ, लालबाग आणि चिंचपोकळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबई सज्ज झाली असून, गणेशोत्सवाचा हा उत्साहाचा सोहळा शांततेत, सुरक्षिततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.





