Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारचा संवादाचा मार्ग खुला; बावनकुळेंचा काँग्रेसवर जोरदार निशाणा

‘तीनदा नव्हे, गरज पडल्यास हजारदा चर्चा करू’; लिखित आश्वासन दिल्याचा दावा, आंदोलनावरून विरोधकांवर टीका

मुंबई : महाराष्ट्रातील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी असलेली वयाची अट रद्द करणे, रिक्त पदांची भरती तसेच अन्य मूलभूत मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे पुण्यातील मांजरी, नाशिक आणि नागपूर येथे आंदोलन व आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका होत असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे राजकारण करून राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने त्यांच्याशी चर्चा केली असून, सकारात्मक निर्णय घेत लिखित आश्वासनही दिल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. सरकार विद्यार्थ्यांशी तीनदा चर्चा करू शकते; गरज पडल्यास चौथ्यांदा नव्हे तर हजारव्यांदाही संवाद साधण्याची सरकारची तयारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट का, असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका’

आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधी यांच्या पुढील महाराष्ट्र दौऱ्यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखा असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि शैक्षणिक संधी वाढविण्यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे हा सरकारचा प्रमुख उद्देश असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा –  शेतीला AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; उत्पादन खर्च ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा फडणवीसांचा निर्धार

‘काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा राजकीय करिअरची चिंता’

काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचविण्याची अधिक चिंता असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत काँग्रेसला खरोखरच आस्था असेल, तर विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनविण्याऐवजी सरकारसोबत संवाद साधावा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये आणि राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा सरकारचा दावा

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असून, चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची तयारी असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये पुढील काळात आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा निघावा, यासाठी संवादातून मार्ग काढण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button