Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर सरकारचा दिलासादायक निर्णय; वर्षभरात जुजबी मराठी शिकण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिष्टमंडळाच्या मागणीनंतर मुदतवाढ

हाजी अराफत यांच्या नेतृत्वाखाली ऑटो आणि रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जुजबी मराठी शिकण्याची आवश्यकता मान्य असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चालकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मात्र, वेगवेगळ्या वयोगटातील चालकांना कमी कालावधीत मराठी शिकणे कठीण असल्याने किमान एक वर्षाची मुदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

ही मागणी लक्षात घेऊन अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची अतिरिक्त मुदत देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  मॉडेल कॉलेजमध्ये सायबर क्राईम जनजागृती सत्र; विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे

वर्षभर कारवाई होणार नाही

या निर्णयामुळे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुदतवाढीच्या या वर्षभरात मराठी भाषेच्या अटीसंदर्भात त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या कालावधीत संबंधित संघटनांकडून चालकांसाठी मराठीचे वर्ग आयोजित केले जाणार असून, मराठी साहित्याच्या माध्यमातूनही जुजबी मराठी शिकवण्याचे प्रयत्न केले जातील.

एक वर्षात मराठी शिका

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना या मुदतीचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे. “या वर्षभरात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकले पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

सरकारच्या या निर्णयामुळे चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असून, प्रवासी आणि चालकांमधील संवाद अधिक सुलभ होण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button