Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वर्ध्यात उभारणार जागतिक दर्जाचे एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र; ३०० एकरांवर २ हजार प्रशिक्षणार्थ्यांची क्षमता

‘स्टोन टू स्ट्रेंथ’ संकल्पनेवर आधारित प्रकल्प; सिम्युलेशन लॅब, परेड ग्राउंड, संग्रहालयासह अत्याधुनिक सुविधांचा समावेश

मुंबई : राज्य राखीव पोलीस बलाचे (एसआरपीएफ) अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे उभारण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.

वर्धा येथील प्रस्तावित एसआरपीएफ विशेष प्रशिक्षण संस्थेसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी एसआरपीएफचे अपर महासंचालक राजकुमार व्हटकर, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वर्मा, मुख्य अभियंता दीपाली भाईक, गृह विभागाचे उपसचिव अजित कवडे, वर्धा जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वर्धा येथे सुमारे ३०० एकर जागेवर २ हजार प्रशिक्षणार्थी क्षमतेचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रात शैक्षणिक व प्रशिक्षण ब्लॉक, सिम्युलेशन लॅब, परेड ग्राउंड, ड्रिल एरिया, क्रीडा आणि अडथळा प्रशिक्षण क्षेत्र, वसतिगृह व भोजनालय यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना डॉ. भोयर यांनी दिल्या.

हेही वाचा –  संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांना ‘पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव पुरस्कार’ प्रदान

याशिवाय वैद्यकीय केंद्र, सेवा व युटिलिटी झोन, स्टाफ सुविधा, व्हीआयपी गेस्ट हाऊस, सभागृह, कॉन्फरन्स हॉल, अनुभव केंद्र आणि पोलीस संग्रहालयाचाही या प्रकल्पात समावेश करण्यात येणार आहे. एसआरपीएफचा इतिहास आणि गौरवशाली परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे अनुभव केंद्र या प्रकल्पाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

या प्रशिक्षण केंद्राची संकल्पना ‘दगडापासून सामर्थ्याकडे’ अर्थात ‘स्टोन टू स्ट्रेंथ’ या संकल्पनेवर आधारित आहे. भरती झालेल्या प्रशिक्षणार्थ्याला विविध प्रशिक्षण प्रक्रियांतून घडवून सक्षम, शिस्तबद्ध आणि कुशल पोलीस अधिकारी व कर्मचारी तयार करण्याचा या संकल्पनेमागील उद्देश आहे.

प्रस्तावित जागा वर्धा शहरापासून सुमारे १० किलोमीटर, वर्धा रेल्वे स्थानकापासून ११ किलोमीटर आणि नागपूरपासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर असून समृद्धी महामार्गाचीही जवळीक आहे. प्रशिक्षण केंद्राचे प्रवेशद्वार किल्ल्याच्या महाद्वाराच्या धर्तीवर भव्य स्वरूपाचे असावे, मुख्य रस्ता १५ मीटर रुंदीचा असावा तसेच संपूर्ण प्रकल्पाचा आराखडा अधिक आधुनिक, सुटसुटीत आणि कार्यक्षम पद्धतीने अंतिम करण्याच्या सूचनाही डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.SRPF Training Centre, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र,

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button