मराठी संवादासाठी पुढाकार! १ लाख ६५ हजार रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे प्रशिक्षण
१०५ दिवसांच्या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; उर्वरित चालकांसाठीही कार्यशाळा सुरू राहणार, मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची अतिरिक्त मुदत

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधता यावा आणि मराठी भाषा व संस्कृतीचा आदर राखला जावा, या उद्देशाने परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या १०५ दिवसांच्या विशेष उपक्रमांतर्गत राज्यातील सुमारे १ लाख ६५ हजार ८०० अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या उपक्रमाला रिक्षा-टॅक्सी चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि संस्कृतीचा आदर राखण्याची भूमिका चालकांनी व्यक्त केल्याचेही त्यांनी नमूद केले.
ज्या चालकांना अद्याप मराठी भाषेचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबई परिसरातील प्रशिक्षण केंद्रांची माहिती संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
हेही वाचा – वर्ध्यात उभारणार जागतिक दर्जाचे एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र; ३०० एकरांवर २ हजार प्रशिक्षणार्थ्यांची क्षमता
प्रशिक्षण केंद्रांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी आरटीओच्या माध्यमातून स्वतंत्र संपर्क क्रमांकही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
मराठी शिकण्यासाठी चालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्यात येणार आहे. या कालावधीत मराठी शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतरही जाणीवपूर्वक मराठी भाषा शिकण्यास नकार दिल्यास नियमानुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते, असेही परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कामगार नेते शशांक राव, तसेच कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठी शिकण्यास इच्छुक असलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यास शशांक राव यांनीही सहमती दर्शविली.
परिवहन विभागाचा हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असून, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ अधिक व्यापक करण्याचे धोरण असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. शासन आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये सातत्याने संवाद सुरू असून, कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.





