TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंधुदुर्ग-कोल्हापूर प्रवास होणार सुसाट; ४० वर्षांपासून रखडलेल्या घोटगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्राची मंजुरी

कुडाळच्या सोनवडेतून गारगोटीला जोडणार नवा घाटमार्ग; ७५-८० किमी अंतर, प्रवासाचा वेळ ३ तासांवरून दीड-दोन तासांवर येणार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कुडाळ तालुक्यातील गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घोटगे-सोनवडे घाट रस्त्याला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत जल्लोष केला. हा घाटमार्ग पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमधील दळणवळण अधिक सुलभ होऊन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

घोटगे-सोनवडे घाटमार्ग लवकरात लवकर व्हावा, यासाठी गेल्या चार दशकांपासून स्थानिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. या मार्गासाठी कै. प्रा. महेंद्र नाटेकर आणि कै. सुशांत दळवी यांनी उपोषण करत आंदोलन केले होते. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनीही या मार्गासाठी पाठपुरावा केला होता.

अखेर या दीर्घ संघर्षाला यश आले असून, आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळ तसेच प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून मार्गाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी राणे कुटुंबीयांचे विशेष आभार मानले.

कोल्हापूरचे अंतर होणार ७५-८० किमी

घोटगे-सोनवडे घाटमार्ग पूर्ण झाल्यानंतर कुडाळहून कोल्हापूरला जाण्यासाठी सुमारे ७५ ते ८० किलोमीटरचे अंतर पार करावे लागणार आहे. सध्या आंबोली किंवा फोंडा घाटमार्गे कोल्हापूरला जाण्यास सुमारे तीन तासांचा कालावधी लागतो. नवीन घाटमार्गामुळे हा प्रवास दीड ते दोन तासांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

कुडाळ तालुक्यातील सोनवडे येथून सुरू होणारा हा घाटमार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे जोडला जाणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमधील वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे.

हेही वाचा –  चाकण-भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला मोठी चालना; ४९ MSME कंपन्यांकडून २,३२० कोटींची गुंतवणूक

व्यापार आणि रोजगाराला चालना

नवीन घाटमार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नसून या भागातील व्यापारी आणि व्यावसायिक हालचालींनाही वेग येण्याची अपेक्षा आहे. वाहतूक व्यवस्था सुलभ झाल्याने स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास मदत होईल. त्यातून व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जनसुनावणीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात

केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे. नवीन आराखडा, तांत्रिक मान्यता आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जनसुनावणी व भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष घाटरस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.

चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर घोटगे-सोनवडे घाटमार्गाला मिळालेल्या मंजुरीमुळे स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्गच्या विकासाला तसेच कोल्हापूरशी असलेल्या दळणवळणाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button