चाकण-भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला मोठी चालना; ४९ MSME कंपन्यांकडून २,३२० कोटींची गुंतवणूक
हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होणार; चाकण-भोसरीसह पुण्यातील औद्योगिक वसाहतींचे ‘औद्योगिक नगरी’त रूपांतर करण्याचा सरकारचा मानस

मुंबई : चाकण-भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नव्या गुंतवणुकीची मोठी ऊर्जा मिळणार आहे. परिसरातील ४९ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसोबत (MSME) सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून तब्बल २ हजार ३२०.९७ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीमुळे उत्पादनक्षमता वाढण्याबरोबरच हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य कराराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि संबंधित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
पुण्याची औद्योगिक परिसंस्था आणखी मजबूत होणार
पुणे आणि परिसरातील ऑटोमोबाईल व अभियांत्रिकी उद्योगांच्या परिसंस्थेत MSME क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मोठ्या उद्योगांना आवश्यक घटक, सुटे भाग, सेवा आणि विविध उत्पादनांचा पुरवठा स्थानिक MSME उद्योगांकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे मोठ्या उद्योगांच्या विस्तारासाठी MSME क्षेत्र महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
स्थानिक उत्पादनांना चालना देत आयातीला पर्याय निर्माण करण्याचे काम MSME क्षेत्र करत आहे. त्यामुळे ‘लोकल टू ग्लोबल’ वाटचालीला बळ मिळत असून, चाकण-भोसरीतील नव्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणखी गती मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा – जरांगे-हाकेंच्या मुंबई आंदोलनापूर्वी सरकारचा मोठा निर्णय; आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलनांना बंदी
एक-दोन वर्षांत उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट
सामंजस्य करार झालेल्या ४९ MSME उद्योगांना आवश्यक जमीन, पायाभूत सुविधा आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग आणि MIDCकडून वेगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. संबंधित उद्योगांनी एक ते दोन वर्षांत उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यामुळे प्रत्यक्ष उत्पादनाबरोबरच रोजगारनिर्मिती, स्थानिक व्यवसायाच्या संधी आणि पुरवठा साखळीचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे.
राज्यात होणार ‘MSME Census’
राज्यातील MSME क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि वेगवान विकास करण्यासाठी शासनाने स्वतंत्र व्यवस्था उभारली आहे. राज्यातील MSME उद्योगांची संख्या, त्यांचे स्वरूप, रोजगारनिर्मिती, उत्पादनक्षमता आणि गरजा यांचा अचूक आढावा घेण्यासाठी ‘MSME Census’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे उद्योगांसाठी अधिक प्रभावी धोरणे आणि सुविधा तयार करता येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
जुन्या औद्योगिक वसाहतींचे ‘औद्योगिक नगरी’त रूपांतर
राज्यातील अनेक औद्योगिक वसाहती ३० ते ४० वर्षांपूर्वी विकसित झाल्या आहेत. बदलत्या काळानुसार या वसाहतींमधील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या औद्योगिक वसाहतींना ‘औद्योगिक नगरी’चा दर्जा देऊन स्वतंत्र प्रशासन व्यवस्था निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. स्थानिक करातून प्रशासन, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याची संकल्पना आहे. या संकल्पनेची सुरुवात पुणे जिल्ह्यातून करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने औद्योगिक वसाहतींचे आधुनिक औद्योगिक नगरीमध्ये रूपांतर करण्याचा शासनाचा मानस आहे.
चाकणमध्ये आणखी मोठ्या गुंतवणुकीची शक्यता
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिक गुंतवणुकीचा उल्लेख केला. उद्योजकांनी मागितलेली जमीन वर्षभरातच अपुरी पडेल, एवढी मोठी गुंतवणूक या भागात अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडवले जात असून, राज्य शासन उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
चाकण-भोसरी परिसरातील उद्योजक राज्याबाहेर स्थलांतरित होत असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. महाराष्ट्रातील एकही उद्योजक राज्याबाहेर गेलेला नसून, राज्यातील गुंतवणूक वातावरणावर उद्योजकांचा पूर्ण विश्वास आहे, असा दावा सामंत यांनी केला.




