नेपाळमध्ये भीषण पूर; १०५ भारतीयांसह २९१ परदेशी नागरिक बेपत्ता

Nepal flash floods | नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे प्रचंड हाहाकार माजला आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून ४१ सुरक्षा कर्मचारी आणि २९१ परदेशी नागरिक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये नेपाळ पोलिसांचे ३२ आणि सशस्त्र पोलिस दलाच्या ९ जवानांचा समावेश आहे.
भोटे कोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने तिबेट सीमेजवळील तिमुरे आणि स्याफ्रु बेसी परिसराला मोठा फटका बसला. पुराच्या वेगवान प्रवाहात अनेक वाहने आणि स्थानिक भाग वाहून गेले असून रस्ते, पूल तसेच जलविद्युत प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेमुळे झालेल्या एकूण नुकसानीचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आज सकाळी अचानक आलेल्या भीषण पुरामुळे नेपाळच्या उत्तरेकडील भागाला मोठा फटका बसला. रासुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसरात भोटे कोशी नदीला सकाळी सुमारे ९ वाजता आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हा पूर तिबेटच्या दिशेने आल्याचे सांगितले जात आहे.बचाव आणि… pic.twitter.com/A1xKqqych8
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 26, 2026
हेही वाचा
चाकणच्या विकासाला मिळणार गती; उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून आढावा
२९१ परदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश
नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, या भीषण पुरामुळे २९१ परदेशी नागरिक बेपत्ता झाले आहेत, ज्यामध्ये किमान १०५ भारतीय पर्यटकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आपत्कालीन यंत्रणा आणि बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिक व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
बेपत्ता सुरक्षा कर्मचाऱ्यांचा शोध आणि मदतकार्य
पुरामुळे प्रभावित भागात मोठ्या प्रमाणावर बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली असून सुरक्षा दलांकडून पूरग्रस्त वस्त्या, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या परिसरात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितले की, पोलीस आणि लष्करी जवानांसह आपत्कालीन पथके बाधित भागात पाठवण्यात आली आहेत, तसेच सखल भागात नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
भोटे कोशी नदीकाठच्या वस्त्यांमधील लोकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीकाठच्या रहिवाशांनी विशेष खबरदारी आणि खबरदारीचे उपाय बाळगावेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.





