TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जरांगे-हाकेंच्या मुंबई आंदोलनापूर्वी सरकारचा मोठा निर्णय; आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलनांना बंदी

आंदोलनासाठी ७ दिवस आधी परवानगी बंधनकारक; सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंतच परवानगी, कमाल ५ हजार आंदोलकांची मर्यादा

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने दक्षिण मुंबईतील आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनांसाठी नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे आणि हाके यांच्या नियोजित आंदोलनांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारने महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत राजपत्राद्वारे हे निर्बंध जाहीर केले आहेत. नागरिकांना आणि वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा तसेच आंदोलने शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावीत, या उद्देशाने हे नियम लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सात दिवस आधी परवानगी आवश्यक

आंदोलन, मोर्चा किंवा धरणे आंदोलनासाठी संबंधित पोलिसांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगी मिळाल्यानंतर एका वेळी केवळ एका दिवसासाठीच आंदोलन करता येणार आहे. तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेतच आंदोलन करता येईल. सायंकाळी ६ नंतर आझाद मैदान रिकामे करावे लागणार असून त्यानंतरही आंदोलक मैदानात थांबल्यास कारवाई होऊ शकते.

आंदोलनासाठी कमाल ५ हजार आंदोलकांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी दौरे, अधिवेशन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन तसेच सुरक्षा कारणांमुळे आंदोलनाची परवानगी नाकारली जाऊ शकते. सुट्टीच्या दिवशी आंदोलनासाठी परवानगी दिली जाऊ शकते.

हेही वाचा –  ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला बीडमध्ये धक्का; सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मोर्चा काढण्यासही निर्बंध

आझाद मैदानाकडे येणाऱ्या किंवा तेथून बाहेर जाणाऱ्या मार्गावर मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल-रिक्षा, हातगाडी, जड वाहने किंवा प्राणी आणण्यासही बंदी आहे.

परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. आंदोलनातील झेंडे आणि बॅनर यांच्यासाठीही आकाराची मर्यादा घालण्यात आली आहे. बॅनर ९ फूट बाय ६ फुटांपेक्षा मोठा नसावा, तर त्यासाठी वापरण्यात येणारी काठी दोन फुटांपेक्षा जास्त लांब नसावी.

आत्मदहन, आमरण उपोषणावरही बंदी

आंदोलनादरम्यान लाठ्या, तलवारी, बंदुका किंवा भाले बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. भडकाऊ भाषणे करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच आक्षेपार्ह चित्रफीत किंवा ध्वनिफीत तयार करून ती समाजमाध्यमांवर प्रसारित करणे, आत्मदहन किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे, आमरण उपोषण करणे, पुतळे, कागदपत्रे किंवा पुस्तके जाळणे यांनाही बंदी घालण्यात आली आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी अन्न शिजवण्यासही मनाई करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई आयोजकांकडून वसूल केली जाणार आहे.

नियम मोडल्यास फौजदारी कारवाई

नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे २९ ऑगस्टला मनोज जरांगे पाटील आणि १ सप्टेंबरला लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान वाढले आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्बंधांमुळे आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असून, नियोजित आंदोलनांसाठी परवानगी कशी मिळणार आणि आयोजक या नव्या नियमांचे पालन कसे करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button