‘स्कूल ठीक करो’ अभियानाला बीडमध्ये धक्का; सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
शाळेतील असुविधांचे व्हिडिओ चित्रीकरण करताना मुख्याध्यापकांना दमदाटी व मारहाणीचा आरोप; कार्यकर्त्यांचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बीड : शाळांमधील असुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला बीडमध्ये वादाचे गालबोट लागले आहे. आष्टी तालुक्यातील वेताळवाडी जिल्हा परिषद शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या कार्यकर्त्यांवर मुख्याध्यापकांना मारहाण आणि दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीजेपीचे कार्यकर्ते तुकाराम वनवे आणि त्यांचे सहकारी वेताळवाडी जिल्हा परिषद शाळेत गेले होते. यावेळी त्यांनी शाळेतील विविध असुविधांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. मात्र, याचदरम्यान मुख्याध्यापक राम खाडे यांच्याशी वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्याध्यापकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शाळा प्रशासनाने सूडबुद्धीने खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप करत त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी आरोप केले जात आहेत.
हेही वाचा – कर्णकर्कश सायलेन्सरविरोधात आता दंडापुरते न थांबता कठोर कारवाई करा; नागपूर खंडपीठाचे निर्देश
दरम्यान, ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबईत भेट घेतली होती. शाळांची पाहणी करताना अडथळे निर्माण होत असल्याची बाब त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. शाळांच्या पाहणीदरम्यान काही त्रुटी किंवा अडचणी आढळल्यास संबंधित सचिवांना फोन अथवा ई-मेलद्वारे माहिती देण्याच्या सूचना शिक्षणमंत्र्यांनी केल्याचे सीजेपी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे शिक्षणमंत्र्यांकडून सहकार्याचे आश्वासन मिळाल्यानंतर लगेचच बीडमध्ये कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आता ‘स्कूल ठीक करो’ अभियानातील कार्यकर्ते आणि शाळा प्रशासन यांच्यातील हा वाद कोणते वळण घेतो, याकडे लक्ष लागले आहे.





