Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन; सीईटीपी प्रकल्पांना गती देण्याचे पंकजा मुंडे यांचे निर्देश

प्रकल्पांच्या विलंबाचा अहवाल आठ दिवसांत सादर करा; सांडपाण्याची विल्हेवाट, गळती आणि अनधिकृत विसर्गावरही कडक नजर

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नदी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून उभारण्यात येत असलेल्या सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना (CETP) गती देण्याचे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. या प्रकल्पांच्या कामांना विलंब का झाला, याचा अहवालही सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री मुंडे यांनी विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. कोल्हापूरसह राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील रेड झोन, साखर कारखाने आणि प्रदूषित क्षेत्रांमधील सर्व सीईटीपी प्रकल्पांची एकूण क्षमता, प्रत्यक्ष वापर आणि संबंधित औद्योगिक घटकांकडून होणारा वापर याची पाहणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

पंचगंगा नदीमध्ये शहर, इचलकरंजी, नगरपालिका, ग्रामपंचायती तसेच औद्योगिक क्षेत्रातून जाणाऱ्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा बैठकीत आढावा घेण्यात आला. प्रस्तावित नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या कामात पंचगंगा नदीचा प्राधान्याने समावेश करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा –  मराठी संवादासाठी पुढाकार! १ लाख ६५ हजार रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे प्रशिक्षण

स्थानिक स्वराज्य संस्था आणि औद्योगिक विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या सीईटीपी प्रकल्पांची यांत्रिकीकरणाची कामे तसेच त्यांना जोडणाऱ्या पाइपलाइनची कामे एकाच वेळी सुरू ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांना याबाबत आदेश देऊन त्याची प्रत सादर करावी, असेही निर्देश देण्यात आले.

केवळ सांडपाणी प्रक्रिया करून थांबता येणार नाही, असे स्पष्ट करताना मुंडे यांनी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची प्रत्यक्ष विल्हेवाट कशी लावली जाते, वाहतुकीदरम्यान गळती होते का आणि कुठे अनधिकृतपणे सांडपाणी सोडले जाते का, यावर प्रभावी देखरेख ठेवण्याची गरज व्यक्त केली.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या चार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामेही लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कोल्हापूरच्या परिघीय शहरी गावांमधील सांडपाणी व्यवस्थापनासाठी संबंधित विभागांची स्वतंत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर पुढील आठवड्यात कोल्हापुरात बैठक घेण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांच्यासह संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button