RKL Galaxy स्कूलची लोहेगाव फुटबॉल स्पर्धेत उत्तुंग कामगिरी; U11 संघ चॅम्पियन
U9 संघ उपविजेता, तर U13 संघाला तृतीय क्रमांक; मयंक काटे ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
लोहेगाव येथील जगद्गुरू अकॅडमीमध्ये २३ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय खासगी फुटबॉल स्पर्धेत RKL Galaxy International School च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध वयोगटांत आपले वर्चस्व सिद्ध केले. शाळेच्या U11 संघाने अजिंक्यपद पटकावले, तर U9 संघाने उपविजेतेपद आणि U13 संघाने तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाचा तुरा खोवला.
अंतिम सामन्यात RKL Galaxy International School च्या U11 संघाने दिघी युनायटेडचा २-० असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या संघात वीर खटके, शार्विल तापकीर (गोलरक्षक), आद्विक रांदिवेकर, अंश डोंगरे, रेयांश नांबूद्री, अहान बागेल, आद्विक पवार, मयंक काटे, ध्रुव माळी आणि दिवित कोबराणे यांचा समावेश होता. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मयंक काटे याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूरवासीयांचा उत्साहात कौटुंबिक स्नेहमेळावा
U9 गटाच्या अंतिम सामन्यात RKL Galaxy संघाने स्पोर्ट्स स्पिरिट एफसीसमोर कडवी झुंज दिली. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ अशा निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे RKL संघाने उपविजेतेपद पटकावले.
या संघात सोहम चौधरी, रिहान रॉय, जीत नहार (गोलरक्षक), त्रिशिव राय, शौर्य भोसले, दर्श राऊत, सचित उकिर्डे, आयुधवीर आणि प्रज्ञान साहू यांनी प्रतिनिधित्व केले. उत्कृष्ट खेळासाठी रिहान रॉय याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
U13 संघाने पटकावला तृतीय क्रमांक
U13 गटातही RKL Galaxy International School च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. सारस चौधरी, पार्थ कपूर, ध्रुव थिटे, कृष्ण हरिबाबू, सर्वज्ञ सालुंखे, आरव चौधरी आणि अन्वय पाटील यांच्या उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व युवा खेळाडूंना प्रशिक्षक रोहन कुकरेजा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंची शिस्त, सातत्यपूर्ण मेहनत आणि सांघिक खेळाच्या बळावर मिळवलेल्या या यशाबद्दल RKL Galaxy International School चे व्यवस्थापन, शिक्षक आणि क्रीडाप्रेमींकडून सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





