ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूरवासीयांचा उत्साहात कौटुंबिक स्नेहमेळावा

गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; डॉ. धनंजय वर्णेकर यांच्या सामाजिक कार्याचा विशेष सन्मान

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूरवासीयांच्या वतीने आयोजित कौटुंबिक स्नेहमेळावा आणि सत्कार समारंभ रविवारी (दि. २३ ऑगस्ट २०२६) साकोसा, प्राधिकरण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थी तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत आपुलकी, स्नेह, सामाजिक एकोपा आणि बांधिलकीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

नगरसेविका तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्या शितलताई धनंजय वर्णेकर यांच्या हस्ते दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

हेही वाचा

गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर; २१ दिवसांचा फर्लो मंजूर, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा सुटका

यावेळी समाजासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. धनंजय वर्णेकर यांना प्रतिष्ठेचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. वर्णेकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

सामाजिक बांधिलकी जपत विविध स्तरांवर सातत्याने कार्य करणाऱ्या डॉ. धनंजय वर्णेकर यांना मिळालेला हा सन्मान निश्चितच अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अमित गोरखे, आमदार शंकरभाऊ जगताप, माजी आमदार अश्विनीताई जगताप, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, शैलजाताई मोरे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिवजी खाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
गुणवंतांचा सन्मान, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेणारे असे उपक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारे आणि नव्या पिढीस प्रेरणा देणारे ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

समाजातील गुणवंत विद्यार्थी, कलाकार, खेळाडू आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही केवळ कौतुकाची बाब नसून, त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा देण्याची सामाजिक जबाबदारी आहे. अशा कौटुंबिक स्नेहमेळाव्यांमधून समाजातील विविध घटक एकत्र येतात, आपुलकीचे नाते अधिक दृढ होते आणि नव्या पिढीला आदर्श व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा मिळते. डॉ. धनंजय वर्णेकर यांना मिळालेला ‘समाजभूषण पुरस्कार’ हा त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव आहे. हा सन्मान त्यांना भविष्यात अधिक व्यापक समाजकार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास आहे.

– शितल वर्णेकर, नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button