लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; १ कोटी ६५ लाख महिलांची ई-केवायसी पूर्ण
जुलै-ऑगस्टचे ३ हजार रुपये कधी मिळणार? तारीख अद्याप जाहीर नाही; पात्र महिलांना नियमित लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या हप्त्याची लाभार्थी महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळणार का आणि खात्यात ३ हजार रुपये कधी जमा होणार, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्याप जुलै-ऑगस्टच्या हप्त्याची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे ३ हजार रुपये देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
हप्ता जमा होण्यास झालेल्या विलंबामागे प्रशासकीय प्रक्रियेचा परिणाम असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता सरकारकडून हप्त्याच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा कधी केली जाते, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माहितीनुसार, राज्यातील १ कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून त्या पात्र लाभार्थी ठरल्या आहेत.
हेही वाचा – ‘सार्वजनिक सेवा हेच माझं कर्तव्य’; तुकाराम मुंढेंचा कामाप्रती निर्धार, ‘मी नाही तर मग कोण?’
योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची पडताळणी करणे तातडीने शक्य नव्हते. त्यानंतर सरकारने लाभार्थ्यांची छाननी सुरू केली. नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी संधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तपासणीदरम्यान काही लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असल्याचे आढळून आले. अशा अपात्र व्यक्तींची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. तसेच काही सरकारी कर्मचारी आणि पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे तपासणीत समोर आले.
अशा अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून घेतलेली रक्कम वसूल केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ई-केवायसी पूर्ण करून पात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांना हप्ता मिळण्याबाबत दिलासा मिळाला असला, तरी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार, याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा कायम आहे.




