मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत मोठी दुर्घटना; मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाचजण जखमी

मुंबई | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आगमन सोहळ्यांची लगबग सुरू असतानाच एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी रात्री मुंबईतील प्रसिद्ध ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीदरम्यान २२ फुटांची भव्य गणेशमूर्ती अचानक कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
वृत्तसंस्था ‘आयएएनएस’ने (IANS) दिलेल्या माहितीनुसार, ‘भुलेश्वरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची २२ फुटांची मूर्ती भायखळा येथून वाजतगाजत भुलेश्वर येथे आणली जात होती. मूर्ती मंडळाच्या मंडपापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर पोहोचली असताना अचानक तोल जाऊन खाली कोसळली. मूर्ती कोसळण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, मूर्तीखाली काही कार्यकर्ते आणि भाविक दबले गेले.
हेही वाचा
‘सार्वजनिक सेवा हेच माझं कर्तव्य’; तुकाराम मुंढेंचा कामाप्रती निर्धार, ‘मी नाही तर मग कोण?’
#WATCH | Mumbai, Maharashtra | Two dead and five injured after a massive Ganesh Idol of Bhuleshwar Cha Raja fell during its arrival procession at the Balaram Merchant Road in the Bhuleshwar area.
The names of the deceased are Sanket Nevshe, 33 years, and Brijesh Hemant Joshi,… pic.twitter.com/QMOC0Y1oLr
— ANI (@ANI) August 22, 2026
बचावकार्य आणि जखमींवर उपचार
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या दुर्घटनेत संकेत नेवशे (वय ३३) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय ३०) या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच जखमी झालेल्या पाच जणांमध्ये ५ आणि ७ वर्षांच्या दोन लहान मुलींचा समावेश असून त्यांच्यावर जी.टी. रुग्णालय, रिलायन्स रुग्णालय, सैफी रुग्णालय आणि जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भुलेश्वर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.





