नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह १५० हून अधिक ब्रँड्सना FSSAI ची नोटीस

नवी दिल्ली | दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, उत्पादनांबाबतचे खोटे दावे आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) मोठी कारवाई केली आहे. अन्न नियामक संस्थेने नेस्ले इंडिया, पेप्सिको आणि कोका-कोला इंडिया यांसारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांसह १५० हून अधिक प्रमुख ब्रँड्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिले आहे.
FSSAI ने सोशल मीडिया पोस्टद्वारे अलिकडच्या काही महिन्यांत केलेल्या अंमलबजावणीच्या कारवाईची माहिती दिली. यामध्ये नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या विविध फूड बिझनेस ऑपरेटर्सवर कारवाई करण्यात आली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, पेप्सिको, कोका-कोला इंडिया, अॅबॉट इंडिया लिमिटेड, रेड बुल इंडिया, डॅनन इंडिया, मॉन्स्टर एनर्जी इंडिया, हेल एनर्जी, मोंडेलीझ इंडिया, डियाजिओ, पेरनोड रिकार्ड, फेरेरो इंडिया आणि केनव्ह्यू इंक यांचा समावेश आहे. ऊर्जा पेये (Energy Drinks) आणि अल्कोहोलयुक्त पेये तयार करणाऱ्या कंपन्यांवरही नियामकाने विशेष नजर ठेवत कठोर पावले उचलली असून अनेक कंपन्यांची मानके डावलणारी उत्पादने जप्त केली आहेत.
हेही वाचा
मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत मोठी दुर्घटना; मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाचजण जखमी
ई-कॉमर्स कंपन्या आणि फूड चेन्सवरही कारवाईचा बडगा
नियामकाने केवळ उत्पादक कंपन्यांवरच नव्हे, तर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि नामांकित रेस्टॉरंट साखळ्यांवरही कारवाईचा फास आवळला आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांना तब्बल १२ नोटिसा बजावण्यात आल्या असून, नियम न पाळल्यामुळे ॲमेझॉनच्या एका गोदामाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. तसेच केएफसी, मॅकडोनाल्ड्स, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी आणि डॉमिनोज यांसारख्या लोकप्रिय फूड सर्व्हिस ब्रँड्सना ३० हून अधिक नोटिसा देण्यात आल्या असून डॉमिनोजच्या पाच परवान्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईनंतर अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये व जाहिरातींमध्ये तातडीने सुधारात्मक बदल करण्यास सुरुवात केली असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे.





