TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुकाराम मुंढेंना २००७ मध्ये मिळालं होतं ‘लाल शाईचं’ धमकीचं पत्र; म्हणाले, ‘माघार घ्या, नाहीतर रक्त सांडेल’

वाळू माफियांवरील कारवाईदरम्यान धमकी; २१ वर्षांच्या कारकिर्दीत २५ बदल्यांचा सामना, सध्या FDAच्या धडक कारवायांमुळे चर्चेत

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यभरातील भेसळखोरांविरोधातील धडक कारवायांमुळे चर्चेत आहेत. भेसळयुक्त दूध-पनीर, हॉटेल-रेस्टॉरंटमधील निकृष्ट अन्न तसेच शाळा-महाविद्यालयांतील कॅन्टीनवर कारवाई करत त्यांनी भेसळखोरांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील एका धक्कादायक प्रसंगाची आठवण सांगितली आहे.

तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल २५ बदल्यांना सामोरे जावे लागल्याचे सांगितले. सुरुवातीच्या काळात कठोर निर्णय घेतल्यामुळे धमक्यांचाही सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

वाळू माफियांविरोधातील कारवाईदरम्यान धमकी

२००७ मध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना मुंढे यांनी वाळू माफियांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती. हा भाग त्यावेळी आंध्र प्रदेशच्या, तर आता तेलंगणाच्या सीमेजवळ होता.

पदभार स्वीकारल्यानंतर साधारण एक-दोन महिन्यांनी त्यांना लाल शाईने लिहिलेले एक पत्र मिळाले. या पत्रात आपण नक्षलवादी असल्याचा दावा करत कारवाईपासून माघार घेण्याची धमकी देण्यात आली होती.

हेही वाचा –  राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर पैशांची उधळण; चौकशी होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माघार घ्या, नाहीतर रक्त सांडेल’

या पत्रात, ‘आमच्या वाटेला जाऊ नका. अन्यथा तुमचे रक्त सांडेल. त्यामुळे माघार घ्या,’ अशा आशयाची धमकी देण्यात आली होती, अशी आठवण मुंढे यांनी सांगितली.

हे पत्र खरेच नक्षलवाद्यांकडून आले होते की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अशा प्रकारचे पत्र आपल्याला मिळाले होते, असे मुंढे यांनी सांगितले.

प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आव्हानांचा सामना

सोलापूर जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुंढे यांच्यावर नगरपालिका मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या काळात अनेक आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. काही महिलांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

दरम्यान, सध्या FDA आयुक्त म्हणून मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेतून अन्न भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यांच्या या धडक कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button