भाजपाचा तरुण मतदारांसाठी ‘मास्टरप्लॅन’; स्मृती इराणी आणि विनोद तावडे मैदानात

BJP Gen Z Outreach Team formed by party | भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रस्तावित ‘जेन झी’ (Gen Z) संपर्क मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी एका समर्पित टीमची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना विद्यापीठे आणि सरकारी शाळांमध्ये थेट संवादाच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क वाढवण्यास सांगितल्यानंतर काही दिवसांतच हे पाऊल उचलण्यात आले आहे. वृत्तसंस्था ‘एएनआय’ (ANI) ने पक्षाच्या एका वरिष्ठ सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या टीममध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे, गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे.
एएनआयने वृत्त दिलं आहे की, “या संपर्क मोहिमेसाठी गठित करण्यात आलेल्या टीममध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे, गुजरातचे मंत्री हर्ष संघवी, छत्तीसगडचे मंत्री ओ. पी. चौधरी यांच्यासह इतर अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.” पक्ष ही मोहीम लवकरच सुरू करण्याची शक्यता असून, यामध्ये प्रामुख्याने जेन झी (तरुण पिढी) च्या आकांक्षा, चिंता आणि अपेक्षांवर लक्ष केंद्रित केलं जाईल. तसंच तरुणांना भाजपा नेत्यांशी संवाद साधण्याची संधी दिली जाईल.
हेही वाचा
‘लाडकी बहीण’ योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार? RTI मधून धक्कादायक माहिती उघड
भाजपाच्या जेन झीच्या मोहिमेमध्ये काय असणार?
भाजपाच्या ‘जेन झी’ मोहिमेमध्ये तरुण मतदारांच्या समस्या समजून घेण्यासाठी संवाद, चर्चा आणि इतर संपर्क उपक्रमांचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. या मोहिमेचे वेळापत्रक, स्वरूप आणि ठिकाणांबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, शनिवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय टीमची पहिली परिचयात्मक बैठक पार पडली. या बैठकीने भाजपाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या टीमच्या कामकाजाची अधिकृत सुरुवात झाली. बैठकीपूर्वी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’च्या सर्व सहा चरणांचे गायन करण्यात आले. नव्याने घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय टीममध्ये विनोद तावडे आणि सुनील बन्सल हे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कायम राहतील. तर बिप्लव कुमार देव, स्मृती इराणी, सतीश पुनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांची नवीन राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर पक्ष संघटनेत अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांची राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर राजस्थानचे राजेश मंगल यांची राष्ट्रीय सह-कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘जेन झी’ संपर्क टीम आता भाजपाच्या प्रस्तावित मोहिमेची तयारी करणार असून, पक्ष आगामी दिवसांत या उपक्रमाचा सविस्तर तपशील जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.





