पालघरमध्ये उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार; १,३९५ एकरांवर १० हजार रोजगाराची संधी
फ्रान्सच्या रुंगीस मार्केटच्या धर्तीवर दापचरीत अत्याधुनिक कृषी हब; शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडण्याचा सरकारचा संकल्प

पालघर : पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे १ हजार ३९५ एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून स्थानिक नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा कृषी बाजार महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणारा ठरेल, असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
दापचरी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार प्रकल्पाच्या जागेची जयकुमार रावल यांनी पाहणी केली. यावेळी पालघरचे अपर जिल्हाधिकारी सुभाष भागडे, बाप्पासाहेब थोरात, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री रावल यांनी संपूर्ण जागेची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. प्रकल्पातील गोशाळा परिसर, गोहर धाड कृषी विभाग आणि नवा मोहरा कृषी विभागासह विविध भागांचीही पाहणी करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने फ्रान्समधील प्रसिद्ध रुंगीस मार्केटच्या धर्तीवर अत्याधुनिक सुविधा आणि संसाधनांनी युक्त आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी कृषी बाजारपेठ उभारण्याचा संकल्प केला आहे, असे रावल यांनी सांगितले.
हेही वाचा – महसूल विभागात मोठी पदोन्नती; ५७ तहसीलदारांसह ८२ अधिकाऱ्यांना बढती
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल या बाजारपेठेत येणार आहे. येथे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, मासे, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि इतर कृषी उत्पादनांसाठी अत्याधुनिक बाजार, प्रक्रिया केंद्रे, पॅकिंग, साठवण आणि निर्यात सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार असून सुमारे १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. रोजगारामध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य दिले जाणार आहे.
कृषी प्रक्रिया उद्योग, गोदामे, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक्स, पॅकिंग, वाहतूक आणि विविध पूरक सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.
सध्या स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांना आपला माल विक्रीसाठी मुंबई किंवा वाशी येथे जावे लागते. मात्र, दापचरी येथे हा प्रकल्प उभारल्यानंतर परिसरातच जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
यामुळे वाहतूक खर्चात बचत होईल, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल, असे रावल यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी कोणाचेही विस्थापन केले जाणार नसल्याचे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून पडून असलेल्या सरकारी जमिनीचा नियोजित विकास करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
हा केवळ बाजार उभारण्याचा प्रकल्प नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देत पालघर परिसराला कृषी व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्तावित कृषी बाजाराला वाढवण डीपवॉटर पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि वडोदरा एक्सप्रेस वे यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची जोड मिळणार आहे.
या जोडणीमुळे दापचरी परिसर इंटिग्रेटेड मल्टी-मोडल कृषी लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित होण्याची अपेक्षा आहे. निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ होऊन लॉजिस्टिक्स खर्चात बचत होईल. फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले आणि प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.





