हैदराबाद हिट अँड रन: खासदाराच्या मुलाच्या लक्झरी कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

हैदराबाद | येथील इनऑर्बिट मॉलसमोर भरधाव ॲस्टन मार्टिन कारने धडक दिल्याने २६ वर्षीय महिला सेल्स एक्झिक्युटिव्ह भारती मुखी हिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आंध्र प्रदेशातील सत्ताधारी आघाडीतील घटकपक्ष असलेल्या जनसेना पक्षाचे राज्यसभा खासदार लिंगमनेनी रमेश यांचा मुलगा लिंगमनेनी संजूश (वय २१) याच्याविरोधात माधापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जेवण आणण्यासाठी बाहेर पडली अन्…
मृत भारती मुखी ही इनऑर्बिट मॉलमधील एका नामांकित दुकानात सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होती. १६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३ वाजता ती तिच्या स्टोअर मॅनेजर पूजा अशोक यांच्यासोबत जेवण आणण्यासाठी मॉलबाहेर पडली होती. रस्ता ओलांडत असताना संजूश चालवत असलेल्या भरधाव आणि अनियंत्रित ॲस्टन मार्टिन कारने भारतीला जोरदार धडक दिली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तिला तात्काळ जुबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले.
हेही वाचा
चाकण परिसराची कचराकोंडी फुटली; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प
#WATCH | Cyberabad Police have seized the Aston Martin car being driven by Lingamaneni Sanjush, 21, son of businessman and Janasena Party Rajya Sabha MP Lingamaneni Ramesh, involved in a fatal car crash on 16th August that resulted in the death of a 26-year-old sales girl.
On… pic.twitter.com/jPD2h3j9Tp
— ANI (@ANI) August 20, 2026
आरोपीला अद्याप अटक नाही
माधापूर पोलिसांनी संजूशविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे आणि जामीनपात्र असल्याने संजूशला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच अपघाताच्या वेळी चालक संजूश दारू किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली नव्हता आणि त्याचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नाही, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी आणि पीडितेची पार्श्वभूमी
आरोपी संजूश हा खासदार लिंगमनेनी रमेश यांचा मुलगा असून त्याने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे व तो एका खासगी ऊर्जा कंपनीत संचालक पदावर कार्यरत आहे. तर मृत भारती ही मूळची ओडिशाची रहिवासी असून हैदराबादमध्ये आपल्या आईसोबत राहत होती; तिच्या आकस्मिक निधनाने सहकारी आणि कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





