सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामांना गती द्या; दादा भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपासला प्राधान्य; अतिक्रमण, भूसंपादन आणि पायाभूत सुविधांची कामे समन्वयाने पूर्ण करण्याच्या सूचना

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी वरील सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामांना गती देऊन दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. विविध विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
सटाणा शहरातील रस्ते बांधकामाशी संबंधित विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी रस्ते बांधकामाची प्रगती, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, भूसंपादन, जलनिस्सारण व्यवस्था आणि पावसाळ्यातील अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील सीमांकन, रिमॅपिंग, क्रॉस सेक्शन ड्रॉइंग तसेच आवश्यक नकाशे तयार करण्यासाठी नगरपालिकेने संबंधित यंत्रणांना सहकार्य करावे. प्रस्तावित कामांसाठी आवश्यक माहिती संकलित करून प्रस्ताव अल्पावधीत पूर्ण करावेत. पुढील १५ दिवसांत संबंधित प्रस्तावांवर आवश्यक कार्यवाही करून त्याचा नियमित पाठपुरावा करावा, असे निर्देश भुसे यांनी दिले.
हेही वाचा – महात्मा फुलेंचे समग्र वाङ्मय सात भाषांत अनुवादित होणार; आशिष शेलारांची मोठी घोषणा
वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.
शहरातील अतिक्रमणे तातडीने हटविण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करावी. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून रस्त्याचे उर्वरित काम मार्गी लावावे. भूसंपादनासाठी पात्र शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करावी, असेही भुसे यांनी सांगितले.
रस्ते कामात येणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर शाळा, बसथांबे आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग आणि बायपासच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
शाळांच्या परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रस्तावित बायपासच्या कामांचे अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करून संबंधित मंत्रालयाकडे पाठवावेत, असे निर्देश भुसे यांनी दिले. मालेगाव शहरातील प्रलंबित बायपासच्या कामाबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
शहरातील उपलब्ध जागा आणि मालमत्तांचा योग्य वापर करून पायाभूत सुविधांचे नियोजन करावे. उपलब्ध जागेच्या आधारे आराखडा तयार करून त्याला आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा, असे भुसे यांनी सांगितले.
शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करताना पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनसह विविध सेवा शक्यतो भूमिगत पद्धतीने नियोजित कराव्यात. शहराच्या पुनर्निर्माण आणि विकासकामांमध्ये दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अतिक्रमणधारकांना संबंधित विभागाने नोटिसा देऊन विहित कार्यपद्धतीनुसार पुढील कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, सटाणा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा हर्षदा पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, प्रांताधिकारी महेश शेलार, मुख्याधिकारी ज्योती भगत, भूमिलेख उपअधीक्षक देवेंद्र भावसार यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे सचिव संतोष शेलार आणि प्रादेशिक अधिकारी प्रशांत हेगडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.





