Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महात्मा फुलेंचे समग्र वाङ्मय सात भाषांत अनुवादित होणार; आशिष शेलारांची मोठी घोषणा

द्विशताब्दी जयंतीनिमित्त ८६१ पानांचा ग्रंथ हिंदीसह सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा भाषेत उपलब्ध होणार

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या समग्र वाङ्मयाचा ग्रंथ सात भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात येणार आहे. हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांमध्ये हा ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या विविध साहित्य अकादमींच्या माध्यमातून साहित्यिक आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे एकदिवसीय अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.

मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींचा विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यास तसेच अन्य भाषांतील उत्कृष्ट साहित्य मराठीत आणण्यास प्रोत्साहन देणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय देशातील अन्य भाषांमध्ये पोहोचले पाहिजे आणि इतर भाषांमधील उत्तम साहित्य मराठी वाचकांपर्यंत आले पाहिजे. भाषेच्या समृद्धीसाठी साहित्यिक आदान-प्रदान महत्त्वाचे आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा –  वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूमुळे बाधित मच्छिमारांना दोन महिन्यांत भरीव नुकसानभरपाई

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून साहित्य अकादमींच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे समग्र वाङ्मय सात भाषांमध्ये अनुवादित करण्यात येणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीने २०१२ मध्ये प्रकाशित केलेल्या ८६१ पानी ‘महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय’ या ग्रंथाचा या उपक्रमांतर्गत अनुवाद केला जाणार आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेत प्रख्यात लेखिका मंजिरी धामणकर, डॉ. शितला प्रसाद दुबे, अजित मन्याल, आलोक सिंह, प्रशांत वर्मा यांच्यासह साहित्य अकादमीचे सचिव सचिन निबांळकर तसेच विविध भाषांतील अनुवादक आणि अभ्यासक सहभागी झाले.

या उपक्रमामुळे महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि साहित्याचा व्यापक प्रसार होऊन देशातील विविध भाषिक वाचकांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचण्यास मदत होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button