पुनावळेत कचरा डेपो नव्हे; ऑक्सिजन पार्कच होणार!
पिंपरी-चिंचवड महापालिकेची ४ कोटी १५ लाखांची निविदा प्रक्रिया

– २२.२० हेक्टर जागेवर साकारणार इको टुरिझम ऑक्सिजन पार्क
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पुनावळेच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता ठोस उत्तर मिळाले आहे. पुनावळेत कचरा डेपो नव्हे, तर ऑक्सिजन पार्कच होणार! पुनावळे येथील स. नं. २३, २४ पैकी तब्बल २२.२० हेक्टर जागेवर इको टुरिझम ऑक्सिजन पार्क विकसित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखेर निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रकल्पासाठी महापालिकेने ४ कोटी १५ लाख २८ हजार ३२ रुपये इतक्या रकमेची निविदा काढली असून, काम पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पुनावळेतील संबंधित जागेबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, या ठिकाणी हरित आणि पर्यावरणपूरक प्रकल्प साकारण्याच्या दिशेने महापालिकेने अधिकृत पाऊल टाकले आहे.
पुनावळे परिसराचा झपाट्याने विकास होत असताना या भागातील मोकळ्या जागांचा वापर कशासाठी होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा होती. विशेषतः कचरा व्यवस्थापनासाठी या परिसराचा वापर होण्याच्या शक्यतेबाबतही चर्चा रंगली होती. मात्र, आता महापालिकेच्या अधिकृत निविदा प्रक्रियेमुळे या जागेचा विकास ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून करण्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पामुळे पुनावळेला मोठे हरित क्षेत्र मिळणार आहे. त्यामुळे ‘कचरा डेपो नको, ऑक्सिजन पार्क हवा’ या अपेक्षेला प्रत्यक्ष विकासकामाची जोड मिळाली आहे.
हेही वाचा – शिवसेनेच्या नाव-चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
२२.२० हेक्टरमध्ये हरित विकास
महापालिकेच्या स्थापत्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या ई-निविदा सूचनेनुसार पुनावळे येथील स. नं. २३, २४ पैकी २२.२० हेक्टर जागेवर हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. ऑक्सिजन पार्कमध्ये नागरिकांसाठी विविध पर्यावरणपूरक आणि मनोरंजनात्मक सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, नेचर ट्रेल, मुलांसाठी खेळाचे क्षेत्र, फाउंटन आणि लँडस्केपिंग यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. पुनावळेचा वाढता विस्तार लक्षात घेता, एवढ्या मोठ्या क्षेत्रावर विकसित होणारे हे हरित क्षेत्र नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात खेळण्यासाठी हा पार्क उपयुक्त ठरणार आहे.
महापालिकेच्या निविदेनुसार या कामाची एकूण निविदा रक्कम ४ कोटी १५ लाख २८ हजार ३२ रुपये आहे. निविदा प्रक्रिया १९ ऑगस्टपासून सुरू झाली असून, २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. निविदापूर्व सभा २१ ऑगस्ट रोजी होणार असून, कामाची मुदत २४ महिने आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार शंकर जगताप यांचा पुढाकारावा…
पुनावळेच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून आमदार शंकरभाऊ जगताप यांनी ऑक्सिजन पार्कच्या संकल्पनेला पुढाकार दिला. पुनावळेकरांना मोठे हरित क्षेत्र उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू होणे हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ऑक्सिजन पार्कसाठी प्रभागातील लोकप्रतिनिधींनीही सातत्याने पाठपुरावा केला. नगरसेविका रेश्मा भुजबळ, नगरसेविका श्रृती वाकडकर, नगरसेवक कुणाल ओव्हाळकर आणि नगरसेवक राहुल कलाटे यांनी पुनावळेकरांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
पुनावळेला हरित ओळख मिळणार : नगरसेविका रेश्मा भुजबळ
नगरसेविका रेश्मा भुजबळ म्हणाल्या, “पुनावळेचा झपाट्याने विकास होत असताना पर्यावरणाचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. ऑक्सिजन पार्कमुळे पुनावळेला मोठे हरित क्षेत्र मिळणार असून, नागरिकांना शुद्ध हवा आणि मोकळी जागा उपलब्ध होईल. कचरा डेपोऐवजी पर्यावरणपूरक प्रकल्प उभा राहत असल्याने ही पुनावळेकरांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे.”
नागरिकांच्या मागणीला मूर्त स्वरूप : नगरसेविका श्रृती वाकडकर
नगरसेविका श्रृती वाकडकर म्हणाल्या, “पुनावळेकरांची ऑक्सिजन पार्कची मागणी होती. आता त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांच्या अपेक्षेला मूर्त स्वरूप मिळत आहे. मुलांसाठी खेळाचे क्षेत्र, नेचर ट्रेल आणि लँडस्केपिंगसारख्या सुविधांमुळे हा पार्क सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. विकासासोबत हिरवाई जपणे ही आमची भूमिका आहे.”
कचरा नव्हे, हिरवाईचा वारसा : नगरसेवक कुणाल ओव्हाळकर
नगरसेवक कुणाल ओव्हाळकर म्हणाले, “पुनावळेच्या भविष्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढत्या नागरीकरणाच्या काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र देणे गरजेचे आहे. पुनावळेत कचरा डेपोची नव्हे, तर हिरवाईची आणि चांगल्या पर्यावरणाची ओळख निर्माण व्हावी, ही आमची भूमिका आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने या दिशेने ठोस पाऊल पडले आहे.”
दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल : नगरसेवक राहुल कलाटे
नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले, “पुनावळेकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने आज महत्त्वाचे पाऊल पडले आहे. ऑक्सिजन पार्कसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आता प्रशासकीय स्वरूप मिळाले असून, महापालिकेने ४ कोटी १५ लाख रुपयांची निविदा काढली आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. पुनावळेत कचरा डेपो नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी ऑक्सिजन पार्कची हरित संपत्ती उभी राहणार आहे.”
पुनावळेच्या विकासाला नवी दिशा
पुनावळेतील वाढत्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांसोबतच पर्यावरणपूरक विकासाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर २२.२० हेक्टर क्षेत्रावर होणारा ऑक्सिजन पार्क हा केवळ एक उद्यान प्रकल्प न राहता पुनावळेच्या पर्यावरणीय भविष्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. कचरा डेपोच्या चर्चेपेक्षा आता पुनावळेकरांसमोर २२.२० हेक्टरच्या ऑक्सिजन पार्कचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘विकासही हवा आणि हिरवाईही हवी’ या भूमिकेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली असून, ‘कचरा डेपो नव्हे; ऑक्सिजन पार्कच!’ असा स्पष्ट संदेश या निविदा प्रक्रियेतून मिळाला आहे.





