TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘अफरातफरी’चा भन्नाट गोंधळ! हवेत उडणाऱ्या नोटा अन् पैशांच्या मागे सुसाट धावणारी पात्रं

मोशन पोस्टरने वाढवलं कुतूहल; मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित चित्रपट ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : हवेत उडणाऱ्या नोटा, पैशांच्या मागे धावणारी माणसं, पोलिसांची धावपळ आणि या सगळ्यातून निर्माण झालेला भन्नाट गोंधळ… हे सगळं पाहायला मिळतंय ‘अफरातफरी’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये. पैशांचा हा मामला नेमका काय आहे आणि त्यासाठी एवढी धावपळ का सुरू आहे, याची उत्सुकता या मोशन पोस्टरने निर्माण केली आहे.

मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित, अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने तयार झालेला ‘अफरातफरी’ हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मोशन पोस्टरमध्ये गावाकडची पार्श्वभूमी दिसते. हवेत उडणाऱ्या नोटांसोबत एकापाठोपाठ एक पात्रं सुसाट धावताना दिसतात. कुणाच्या हातात बंदूक, कुणाच्या चेहऱ्यावर चिंता, तर कुणी पैशांच्या मागे धावताना दिसत आहे. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ‘सोड चिंता असते ती चितेसमान, कर्म कर, तू ठेव गीतेचा मान’ आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते, फळाची चिंता सोडून दे’ या गीतेतील ओळी ऐकू येतात.

हेही वाचा –  पुनावळेत कचरा डेपो नव्हे; ऑक्सिजन पार्कच होणार!

मोशन पोस्टरमधील या ओळी आणि पैशांभोवती फिरणारा गोंधळ यामुळे चित्रपटाच्या कथेबद्दल कुतूहल आणखी वाढलं आहे. या पैशांमुळे कोणाच्या आयुष्यात काय उलटापालट होणार आणि या सगळ्या अफरातफरीमागचं नेमकं कारण काय, हे चित्रपट पाहिल्यानंतरच समोर येणार आहे.

‘अफरातफरी’मध्ये मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री, विनोद आणि पैशांभोवती फिरणारी गमतीदार कथा यामुळे ‘अफरातफरी’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणाले, “‘अफरातफरी’ हा मनोरंजनाने भरलेला चित्रपट आहे. पैशांभोवती फिरणाऱ्या या कथेत अनेक पात्रं आणि त्यांच्या वाट्याला येणारे मजेशीर प्रसंग यामुळे परिस्थिती अधिकच गुंतत जाते. मोशन पोस्टरमधून या गोंधळाचा अंदाज येतो. कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री, विनोद आणि सतत रंगणारी धावपळ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

आता या पैशांच्या अफरातफरीचा नेमका शेवट काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना ९ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button