शिवसेनेच्या नाव-चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले जाऊ शकते; दोन्ही शिवसेनेतील आमदार-खासदारांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह असल्याचा आंबेडकरांचा दावा

मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाकडे राहणार, यावर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीचा आज आठवा दिवस असून, संपूर्ण महाराष्ट्राचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर मोठा दावा केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाकडून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दोन्ही शिवसेनेला एकमेकांविरोधात नव्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते. तसेच धनुष्यबाण चिन्ह नसताना दोन्ही गटांकडे असलेले आमदार आणि खासदार त्यांच्यासोबतच राहतील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या प्रकरणावर भाष्य केले आहे. यापूर्वी भाजपकडून पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र जंतरमंतरवरील आंदोलनामुळे त्याला आळा बसला होता, असा दावा त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आमदार आणि खासदारांची मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी पाहायला मिळू शकते, असा खळबळजनक दावाही आंबेडकर यांनी केला आहे.
हेही वाचा – ‘वंदे मातरम’वरून राजकीय रणकंदन; अमित शाह यांचा काँग्रेसवर तुष्टीकरणाचा आरोप
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सुनावणीत त्यांनी आमदार अपात्रता, शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यासह विविध मुद्द्यांवर युक्तिवाद केला.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना २१ जून रोजी शिवसेनेत फूट पडली नव्हती, असा दावा केला. त्यानंतर आमदार मागच्या मार्गाने पक्षाबाहेर गेले आणि २६ जूनपर्यंत एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून दावा केला नव्हता, असा युक्तिवाद करण्यात आला.
संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष नव्हे, मात्र विधानसभा अध्यक्षांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला.
ठाकरे गटाने शिवसेना पक्ष आपलाच असल्याचा दावा करत ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याची मागणीही केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ठाकरे गटाच्या वकिलांना, एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येईल का, असा प्रश्न विचारल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाचे वकील सर्वोच्च न्यायालयात काय बाजू मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येणार, याची उत्सुकता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे.





