Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचऱ्याच्या प्रश्नावर भाजपा नगरसेवकांनी स्थायी समितीत प्रशासनाला घेरले..!

४० दिवसांत ६० हजार टन अतिरिक्त कचरा; प्रक्रिया मात्र शून्य..!

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी 

शहरातील वाढत्या कचरा प्रश्नावरून महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेत नऊ कर्मचारी बांधवांचा मृत्यू झाला. या घटनेला सुमारे ४० दिवस उलटूनही कचरा व्यवस्थापनात ठोस बदल का झाला नाही, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.

नगरसेविका सारिका गायकवाड यांनी मोशी येथील प्रक्रिया प्रकल्प बंद असतानाही दररोज सुमारे १,४०० ते १,५०० टन कचरा मोशी डेपोमध्ये डम्पिंग होत असल्याचा मुद्दा मांडला. तर नगरसेविका अर्चना करांडे यांनी गेल्या ४० दिवसांत अंदाजे ५६ ते ६० हजार टन अतिरिक्त कचरा जमा झाल्याचे सांगत, या काळात प्रशासनाने नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या, असा थेट जाब विचारला.

योगिता नागरगोजे आणि कृष्णा सुरकुले यांनीही शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर होत असताना नागरिकांच्या आरोग्याशी निगडित कचरा प्रश्नाकडे दुर्लक्ष का, असा सवाल केला. शीतल वर्णेकर यांनीही कचरा व्यवस्थापनाबाबत ठोस नियोजनाची मागणी केली.

या बैठकीत छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ संदर्भातील वाढीव आर्थिक तरतुदीच्या विषयावरही भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी ठाम भूमिका मांडली.

हेही वाचा

‘आरएसएस’वर बंदी घाला; अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाची सरकारकडे मागणी

दरम्यान, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी मोशी डेपोमध्ये काम करणाऱ्या इतर कंपन्यांवरही दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कारवाईची मागणी केली. त्यावर भाजप नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील कचरा प्रश्नावर त्यांनी आतापर्यंत काय भूमिका घेतली, असा प्रतिप्रश्न केला.

आयुक्त व अधिकाऱ्यांची अनुपस्थिती; सर्वसाधारण सभेत आयुक्त भूमिका स्पष्ट करणार..

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि प्रमुख अधिकारी बैठकीला अनुपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी शहरातील दहा क्षेत्रीय प्रभागांमध्ये कचरा संकलन केंद्रांसाठी जागा शोधण्यात आल्याची माहिती दिली. या विषयावर आयुक्त आगामी सर्वसाधारण सभेत सविस्तर माहिती देतील, असे आश्वासन देण्यात आले.

कचरा प्रश्नावरून सर्वसाधारण सभेत होणार खडाजंगी..?

कचरा प्रक्रिया केंद्रे, ‘लीगेसी वेस्ट’, पर्यायी व्यवस्था आणि संबंधित कंपन्यांवरील कारवाई या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने आगामी सर्वसाधारण सभेत कचरा प्रश्नावर पुन्हा जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button