चंद्रशेखर बावनकुळेंवर भाजपची नवी जबाबदारी; राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी सहप्रभारी
राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून नियुक्ती; निवडणूक व्यवस्थापनातील अनुभवामुळे पक्षाने सोपविली महत्त्वाची जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भारतीय जनता पक्षाने नवी संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. राजस्थानमध्ये होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बावनकुळे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. निवडणूक व्यवस्थापनासाठी विविध राज्यांतील अनुभवी नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. माजी खासदार हरीश द्विवेदी यांची राजस्थान निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, बावनकुळे यांच्यासह पाच नेत्यांना सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा – संत तुकाराम नगरमध्ये भव्य तिरंगा रॅली; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षसंघटनेचा मोठा अनुभव आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पक्षसंघटना मजबूत करणे, निवडणूक व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचा त्यांचा अनुभव लक्षात घेऊन राजस्थानची जबाबदारी देण्यात आल्याचे मानले जात आहे.
यापूर्वी मार्च २०२६ मध्ये ओडिशातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बावनकुळे यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. ही नियुक्तीही राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी केली होती.
दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असतानाच बावनकुळेंवर राजस्थानची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी बावनकुळेंवर टीका केली आहे. त्यामुळे भाजपच्या या नियुक्तीची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.





