ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

आळंदीतील स्मिता लक्ष्मीबाई दुराफे विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती

‘माझा डेटा, माझी जबाबदारी’चा विद्यार्थ्यांना संदेश; फिशिंग, ओटीपी फसवणूक, बनावट लिंक आणि सोशल मीडिया सुरक्षेबाबत मार्गदर्शन

आळंदी : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत निर्माण होणारे विविध सायबर धोके लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्मिता लक्ष्मीबाई व्ही. दुराफे विद्यालय, आळंदी येथे इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य संदेश ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ हा होता. इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करताना वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे तसेच डिजिटल जगात जबाबदारीने वावरणे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सत्रामध्ये विद्यार्थ्यांना फिशिंग, बनावट लिंक व संदेश, ओटीपी फसवणूक, सुरक्षित पासवर्ड, सोशल मीडिया गोपनीयता, ऑनलाइन गेमिंगचे धोके, मोबाईल सुरक्षा, डिजिटल फूटप्रिंट आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दैनंदिन जीवनातील उदाहरणे, संवादात्मक चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर धोके ओळखण्याचे आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्याचे सोपे मार्ग समजावून सांगण्यात आले.

या जनजागृती सत्राचे मार्गदर्शन एमआयटी एसीएससी, आळंदी येथील सायबर वॉरियर टीममधील सोहेश देशमुख, माध्यम संचालक व सायबर वॉरियर, तसेच पूर्वजा महाजन, उपक्रम संचालक व सायबर वॉरियर यांनी केले. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी सुरक्षित इंटरनेट वापर, डिजिटल जबाबदारी आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.

सायबर सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीस वैयक्तिक माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि ऑनलाइन व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. डिजिटल जगात एखादी छोटीशी चूकही मोठ्या सायबर फसवणुकीला कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक असल्याचेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग…

क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर तसेच संस्थेतील सहकाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना लहान वयातच सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी समजावून देणे आणि त्यांच्यामध्ये डिजिटल शिस्त व जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, हा उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उद्देश ठरला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. ‘सुरक्षित डिजिटल वापर ही काळाची गरज असून, स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ हा संदेश देत जनजागृती सत्राची सांगता झाली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button