Breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदी राज दुर्गे; पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडणार!

- शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान - संघटन बळकटीकरणासह विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी नगरसेवक राज अनंत दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासह विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना वस्तुस्थितीच्या आधारे प्रत्युत्तर देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता दुर्गे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा- कॅनडात RSS वर बंदीची मागणी; मोहन भागवत यांच्या प्रवेशालाही विरोध, राजकीय वातावरण तापलं; नेमकं काय घडलं?

भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते दुर्गे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आगामी काळात शहरातील राजकीय घडामोडी, महापालिकेतील विकासकामे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी मांडणी करण्यासाठी पक्षाच्या माध्यमिक आणि सोशल मीडिया संवादव्यवस्थेत दुर्गे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

विकासकामे आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविणार

राज दुर्गे हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व, प्रभावी वक्ते आणि संघटनात्मक कामाचा अनुभव असलेले कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाची बाजू अधिक आक्रमक आणि वस्तुनिष्ठपणे मांडण्यास मदत होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. यावेळी शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “राज दुर्गे हे अभ्यासू, प्रभावी वक्ते असून पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणारे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी मांडणी करणे, महापालिकेच्या माध्यमातून शहरात झालेल्या विविध विकासकामांचा आलेख जनतेसमोर मांडणे आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देणे, यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या संवादव्यवस्थेला निश्चितच बळ मिळेल.”

“पक्षाची ध्येय-धोरणे पूर्ण ताकदीने मांडणार”

नियुक्तीनंतर राज दुर्गे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त करत आगामी काळात मिळालेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. “माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. भारतीय जनता पार्टीची ध्येय-धोरणे, विचारसरणी तसेच पिंपरी-चिंचवड शहरात झालेला विकास विविध प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्यरत राहीन. पक्षाची भूमिका ठामपणे मांडतानाच विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याचे काम केले जाईल,” असे दुर्गे यांनी सांगितले. राज दुर्गे यांच्या नियुक्तीमुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर भाजपची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली जाण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button