गोव्यातील नागरिकांना मोठा दिलासा! वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत; 9 सप्टेंबरपासून योजनेची अंमलबजावणी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा; लाभार्थ्यांच्या खात्यात दरवर्षी 3 हजार रुपये जमा होणार

पणजी : एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने नागरिकांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. राज्यातील पात्र नागरिकांना दरवर्षी तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी सरकारकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ३ हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या योजनेची घोषणा केली. ९ सप्टेंबर २०२६ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू होणार असून, योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना पंचायत कार्यालय किंवा संबंधित आमदारांच्या कार्यालयातून अर्ज मिळणार आहेत. अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, २०२२च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी नागरिकांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ केवळ गोवा राज्यातील पात्र नागरिकांनाच मिळणार आहे. इतर राज्यांतील नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
दरम्यान, स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील तणाव आणि एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी कनेक्शनसंदर्भात केवायसी आणि एका व्यक्तीला एकच गॅस कनेक्शन अशा उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे गोवा सरकारची ही घोषणा नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.





