FACT CHECK | ‘डीपी’ हरकतींचा गाजावाजा; प्रत्यक्षात सुनावणीला अत्यल्प प्रतिसाद?
२,३४१ नोटिसा, पण दिवसभरात अवघे १२३ ते २५० हरकतदार उपस्थित; अनेकांचा धक्कादायक दावा – "आम्ही हरकतच घेतली नव्हती!"

पिंपरी- चिंचवड | विशेष प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यावर (DP) दाखल झालेल्या तब्बल ५६ हजारांहून अधिक हरकतींचा आकडा वास्तवात किती विश्वासार्ह आहे? हा प्रश्न पहिल्याच दिवशी झालेल्या सुनावणीनंतर उपस्थित झाला आहे. कारण, पहिल्या दिवशी सुमारे २,३४१ हरकतदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या असतानाही प्रत्यक्ष सुनावणीसाठी अवघे १२३ ते २५० नागरिक उपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या कालावधीत सुनावणी झाली. प्रशासनाने अंदाजे २,२५० नागरिकांना बोलावले असतानाही उपस्थिती अत्यल्प राहिली. यामुळे हरकतींच्या एकूण संख्येबाबत नव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत.
हरकतच घेतली नव्हती; मग नोटीस कशी?
सुनावणीसाठी आलेल्या अनेक नागरिकांनी धक्कादायक दावा केला. “आम्ही विकास आराखड्यावर कोणतीही हरकत दाखल केलेली नाही. तरीही आमच्या नावाने नोटीस आली,” असे अनेकांनी अधिकाऱ्यांसमोर सांगितल्याची माहिती मिळाली.
काहींना आपण हरकत अर्ज केला होता, हेही आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या नावाने तिसऱ्याच व्यक्तीने हरकत दाखल केली का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
हरकतींचा आकडा कृत्रिमरीत्या वाढवला?
या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी आणि उपस्थितांनी असा संशय व्यक्त केला की, हरकतींचा आकडा फुगवण्यासाठी काही व्यक्तींनी इतरांच्या नावाने व मोबाईल क्रमांकांचा वापर करून अर्ज दाखल केले असावेत. त्यामुळे प्रत्यक्ष हरकतदार आणि अर्जातील नाव यामध्ये तफावत निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत पुरावा किंवा प्रशासनाची पुष्टी उपलब्ध नाही. त्यामुळे हा मुद्दा तपासाचा विषय ठरू शकतो.
पहिल्याच दिवशी वास्तव समोर?
महापालिकेने विकास आराखड्यावर ५६,७७९ हरकती प्राप्त झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र, पहिल्याच दिवशी सुनावणीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने या सर्व हरकती प्रत्यक्ष संबंधित नागरिकांनीच दाखल केल्या होत्या का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.





