तरुण तेजपाल बलात्काराच्या प्रकरणात दोषी, दुपारी शिक्षेची घोषणा

Tarun Tejpal | पत्रकार आणि ‘तेहलका’चे माजी मुख्य संपादक तरुण तेजपालला गुरुवारी बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. तेजपाल यांना २०२१ मध्ये निर्दोष मुक्त करणारा सत्र न्यायालयाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोठा खंडपीठाने आज रद्द केला. तेजपालला आज दुपारी २.३० वाजता शिक्षा जाहीर केली जाणार आहे. सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या तेजपालने ते दोन मुलींचे वडील असल्याचा दावा करत दयेची याचना केली, तर गोवा सरकारतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी “नाही म्हणजे नाही” असा संदेश देण्यासाठी कमाल शिक्षेची मागणी केली आहे.
गोव्यातील एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपालने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिला सहकाऱ्याने केला होता. ७ आणि ८ नोव्हेंबर २०१३ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी २०२१ मध्ये गोव्याच्या सत्र न्यायालयाने तेजपालची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. दरम्यान, या निकालावर आक्षेप घेत गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोठा खंडपीठात अपील केले होते. गोवा सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी बाजू मांडली. गोव्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी याप्रकरणी बोलताना सत्र न्यायालयाचा निर्णय आश्चर्यकार्यक होता असे मत मांडले. दुपारी दोन वाजता तेजपाल प्रकरणावर उच्च न्यायालयात शिक्षा सुनावली जाईल, असेही पांगम म्हणाले.
हेही वाचा
२०२१ मध्ये सत्र न्यायालयाने केले होते निर्दोष मुक्त
२०२१ च्या निकालात सत्र न्यायालयाने महिलेच्या वर्तनावर बोट ठेवत, त्यामुळे तिची केस कमकुवत झाल्याचे म्हटले होते. “तक्रारदार महिलेचे वर्तन, सलग दोन रात्री लैंगिक अत्याचार झालेल्या कोणत्याही पीडितेच्या सामान्य वर्तनासारखे दिसत नाही”, असे न्यायालयाने नमूद केले होते. आपल्या निकालात सत्र न्यायालयाने महिलेचे जुने संबंध, तिचे विचार, घटनेनंतरच्या फोटोंमध्ये ती आनंदी दिसणे, एका अभिनेत्याला रात्री उशिरा त्याच्या हॉटेल रूममध्ये सोडणे आणि मित्रांसोबतचे तिचे व्हॉट्सॲप चॅट्स या सर्व गोष्टींचा संदर्भ दिला होता.





