भारतीय बॉक्सरची ऐतिहासिक ‘सुवर्ण’ घोडदौड! सचिन, प्रीतीसह ७ बॉक्सर चमकले

CWG 2026 | राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय बॉक्सिंग संघाने आपल्या धडाकेबाज कामगिरीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांतील मुष्टियोद्ध्यांनी रिंगणात भारतीय पंचांचा असा काही मारा केला की पदकांची जणू लयलूटच झाली. विशेषतः भारताच्या लेकींनी ५ सुवर्णपदके जिंकून पदकांची चळत लावली. ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोर्गोहेनला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं असलं, तरी संपूर्ण भारतीय तुकडीने रिंगणात आपला दबदबा कायम ठेवला.
पदकविजेत्या भारतीय बॉक्सरची यादी:
- प्रीती पवार – सुवर्णपदक (५४ किलो वजनी गट, महिला)
- जास्मिन लम्बोरिया – सुवर्णपदक (५७ किलो वजनी गट, महिला)
- साक्षी चौधरी – सुवर्णपदक (५१ किलो वजनी गट, महिला)
- प्रिया घंघास – सुवर्णपदक (६० किलो वजनी गट, महिला)
- अरुंधती चौधरी – सुवर्णपदक (महिला)
- सचिन सिवाच – सुवर्णपदक (६० किलो वजनी गट, पुरुष)
- अंकुश पंघाल – सुवर्णपदक (८० किलो वजनी गट, पुरुष)
- जादूमणी सिंग मांडेंगबाम – रौप्यपदक (५५ किलो वजनी गट, पुरुष)
- लव्हलिना बोर्गोहेन – रौप्यपदक (७५ किलो वजनी गट, महिला)
- नरेंद्र बेरवाल – रौप्यपदक (९० किलो वजनी गट, पुरुष)
अंतिम सामन्यांचा थरार: महिला बॉक्सरची ‘सुवर्ण’ भरारी
महिलांच्या अंतिम लढतींमध्ये भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व पाहायला मिळाले. हरियाणाच्या भिवानी येथील आशियाई विजेत्या प्रीती पवारने ५४ किलो गटात कॅनडाच्या स्कार्लेट सवाना डेलगाडो हिला ५-० असे एकमताने नमवून भारताचे सुवर्णपदकाचे खाते उघडले. पाठोपाठ जास्मिन लम्बोरियाने उत्तर आयर्लंडच्या तीन वेळा राष्ट्रकुल पदक विजेत्या मायकेला वॉल्श हिचा पराभव करत दुसरे सुवर्ण जिंकले.
हेही वाचा
“जगाच्या भल्यासाठी हल्ला रद्द करतोय!”: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
साक्षी, प्रिया आणि अरुंधतीची रणनीतिक मात:
साक्षी चौधरीने ५१ किलो गटात इंग्लंडच्या रुबी व्हाईटवर ५-० अशी एकतर्फी मात केली. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या प्रिया घंघासने ६० किलो गटात कॅनडाच्या मारी-बथूल अल-अहमदियेहविरुद्ध आपल्या उंचीचा व संयमी खेळाचा वापर करत सुवर्णपदक पटकावले. दुसरीकडे, अरुंधती चौधरीने आपल्या चपळ पायांच्या हालचालींनी इंग्लंडच्या शँटेल रीडला सतत रिंगभर फिरवत ठेवले आणि चेहऱ्यावर हास्य ठेवत सामना पूर्णपणे नियंत्रणात ठेवून सुवर्णपदकाला गवसणी घातली.
पुरुषांचे ऐतिहासिक पुनरागमन आणि लव्हलिनाचा लढा
पुरुषांच्या ६० किलो गटात सचिन सिवाचने अद्भूत पुनरागमन केले. पहिल्या दोन फेऱ्यांत पिछाडीवर असलेल्या सचिनने तिसऱ्या फेरीत नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंग न्देवेलोला याला असा खणखणीत पंच मारला की प्रतिस्पर्धी रिंगवर कोसळला. पंचांच्या ‘स्टँडिंग एट काउंट’नंतर सचिनने ३-२ अशा विभाजित निर्णयाने सुवर्णपदक आपल्या नावे केले. ८० किलो गटात अंकुश पंघालने इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूचा पराभव करत सुवर्ण पटकावले.
रौप्यपदकाची कमाई:
पहिल्यांदाच राष्ट्रकुल खेळणाऱ्या जादूमणी सिंगला पुरुषांच्या ५५ किलो गटात ऑस्ट्रेलियाच्या जाय डिक्सनकडून पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर महिलांच्या ७५ किलो गटात ऑलिम्पिक पदकविजेती लव्हलिना बोर्गोहेन आणि ऑस्ट्रेलियाची ग्रीनट्री यांच्यात अटीतटीची लढत झाली. डोळ्यावर झालेल्या जखमेतून रक्त येत असतानाही ग्रीनट्रीने १-४ अशा फरकाने बाजी मारल्यामुळे लव्हलिनाला रौप्यपदक मिळाले.





