भालाफेकमध्ये भारताचा डंका! नीरज चोप्रासह रोहित आणि यश अंतिम फेरीत दाखल

Commonwealth Games 2026 | ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरुच आहे. स्पर्धेच्या आठव्या दिवशी भालाफेक (Javelin Throw) क्रीडा प्रकारात भारताने आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले आहे. भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याने अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे, नीरजसोबतच भारताच्या रोहित यादव आणि यश वीर सिंग यांनीही फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भालाफेकमध्ये भारताला एकापेक्षा जास्त पदके मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
भालाफेक क्रीडा प्रकारात १४ देशांतील तब्बल १८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या १८ पैकी १२ सर्वोत्तम खेळाडूंनी अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले असून ते पदकासाठी झुंज देताना दिसून येणार आहेत. पात्रता फेरीत नीरज चोप्राने ७९.६१ मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आणि तो ५ व्या स्थानी राहिला. तर रोहित यादवने ७८.३७ मीटर सर्वोत्तम थ्रो करून आणि यश वीर सिंगने ७८.३६ मीटर लांब थ्रो करून फायनलमध्ये प्रवेश केला. या फेरीत श्रीलंकेचा रुमेश पथिराज ८२.८४ मीटर लांब भाला फेकून अव्वल स्थानी राहिला, तर ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ७८.६३ मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.
हेही वाचा
भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू
अंतिम लढत कधी आणि कुठे पाहाल?
भारताला एकापेक्षा जास्त पदके मिळण्याची आशा असणारा हा थरारक अंतिम सामना शनिवारी, १ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार ही लढत दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार आहे. ही लढत प्रेक्षकांना सोनी स्पोर्ट्स (Sony Sports) वाहिनीवर आणि सोनी लिव्ह (Sony LIV) अॅपवर थेट पाहता येईल.
नीरज चोप्राकडून पुन्हा सुवर्णकामगिरीची अपेक्षा
नीरज चोप्राने यापूर्वी २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ८६.४७ मीटर लांब थ्रो करून सुवर्णपदकाची कमाई केली होती. दुर्दैवाने, २०२२ मधील राष्ट्रकुल स्पर्धेत दुखापतीमुळे तो सहभागी होऊ शकला नव्हता. आता पुनरागमन करत नीरजने पुन्हा एकदा अंतिम फेरीत प्रवेश केल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या महामुकाबल्याकडे लागले आहे.





