ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ‘नारी द वुमन’ संस्थेचा पुढाकार; रोजगार, शिक्षण, समुपदेशन व सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यावर भर

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि ‘नारी द वुमन’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन उपमहापौर शर्मीलाताई बाबर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२३ जुलै) सायंकाळी सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तृतीयपंथीय समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक स्वीकार यावर भर देत मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन नारी द वुमन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख व उपाध्यक्षा अर्चना मेंगडे यांनी केले होते.

या कार्यक्रमाला उपमहापौर शर्मीलाताई बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे,सामाजिक समरसता गतिविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजक विलास लांडगे,सामाजिक समरसता गतिविधी प्रांत मंडळाचे सदस्य ॲड. मुकुंद यदमळ,डॉ. आम्रपाली मोहिते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी उपमहापौर बाबर म्हणाल्या की, समाजाने तृतीयपंथीयांकडे दयेच्या नव्हे तर समानतेच्या आणि सन्मानाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असून, तृतीयपंथी असणे हा कोणताही शाप नसून तो निसर्गाचा स्वीकार आहे.रोजगाराच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना सक्षम बनविणे आवश्यक आहे. ‘नारी द वुमन’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्षा अर्चना मेंगडे, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे तसेच या उपक्रमाशी संबंधित सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेले हे समुपदेशन केंद्र राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरेल.महानगरपालिका विविध कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असून, तृतीयपंथीयांनी या संधींचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

तृतीयपंथीयांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.”परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. तृतीयपंथीय असणे हा शाप नाही. समाजाने अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून त्यांना शिक्षण, रोजगार आणि समान संधी द्यायला हव्यात,” महानगरपालिकेने तृतीयपंथीयांसाठी सुरू केलेले उपक्रम देशासाठी आदर्श ठरतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना हा राज्यातील पहिला आणि वेगळा प्रयोग असल्याचे सांगितले.”अर्चना मेंगडे यांच्या संकल्पनेला तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी गती दिली. आज तृतीयपंथीय महानगरपालिकेत विविध पदांवर काम करत आहेत. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी हे समुपदेशन केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे,” तसेच तृतीयपंथीयांसाठी भविष्यात आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही कांबळे यांनी दिली.

केवळ कायदे करून समानता मिळत नाही, तर समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि ‘नारी द वुमन’ संस्थेच्या पुढाकारातून सुरू झालेले हे तृतीयपंथीय समुपदेशन केंद्र तृतीयपंथीयांना सन्मान, स्वाभिमान, रोजगार आणि समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्वास नारी द वुमन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असिफ शेख यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

‘मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा’; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

हेमंतजी हरहरे म्हणाले की,संवेदनशीलता हाच बदलाचा पाया असून तृतीयपंथीयांच्या समस्या समजून घेण्यासाठी संवेदनशीलता आवश्यक आहे.त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांचे जीवन जवळून पाहिल्यावर त्यांच्या संघर्षाची खरी जाणीव होते. समाजाने त्यांच्याकडे सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या भावनेने पाहिले पाहिजे.

महानगरपालिकेने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असून समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन विलास लांडगे यांनी केले.

संविधानाने दिलेले समानतेचे अधिकार प्रत्यक्षात समाजात रुजवण्याची गरज आहे.तृतीयपंथी यांनी केंद्र सरकारच्या SMILE योजना, गरिमा गृह योजना, तसेच ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राइट्स) कायदा, 2019 या शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. मुकुंद यदमळ यांनी केले.

समाजविकास विभागाचे तत्कालीन अधिकारी सुहास बहादरपुरे यांनी चार वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी योजना सुरू करण्याची कल्पना कशी साकार झाली याचा प्रवास उलगडला.ते म्हणाले, “महानगरपालिकेकडे अनाथ, दिव्यांग, महिला, मागासवर्गीय आणि इतर घटकांसाठी योजना होत्या; मात्र तृतीयपंथीयांसाठी एकही योजना नव्हती. त्यांना समाज, कुटुंब आणि नातेवाईकांकडून नाकारले जाते. त्यामुळे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आवश्यक होते.”सुरुवातीला तृतीयपंथीयांच्या गुरूंशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर अर्चना मेंगडे यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते उघडणे अशा मूलभूत कागदपत्रांची व्यवस्था करून दिली. त्यानंतर अनेक तृतीयपंथीयांना महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देण्यात आली.”पहिल्यांदा वर्दी अंगावर चढवताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अनेक वर्षांपासून संपर्क तुटलेल्या आई-वडिलांनी महानगरपालिकेत येऊन आपल्या मुलांना भेट दिली. हा आमच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता,” असे बहादरपुरे यांनी सांगितले.

तृतीयपंथीय समाजाच्या प्रतिनिधी डॉ. आम्रपाली मोहिते यांनी अत्यंत भावनिक भाषण करत समाजाच्या दुटप्पी मानसिकतेवर भाष्य केले.”आम्ही भारताचे नागरिक आहोत. संविधानाने आम्हाला समानतेचा अधिकार दिला आहे. तरीही आम्हाला समाजात उपेक्षित जीवन जगावे लागते. लिपस्टिक आणि मेकअपच्या मागे आमच्या वेदना कोणी पाहत नाही,”त्यांनी आसिफ शेख आणि अर्चना मेंगडे यांच्या कार्याचे कौतुक करत, “या दोघांनी आम्हाला सन्मानाने जगण्याची नवी आशा दिली आहे,” असे सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या तृतीयपंथीय शिक्षिका किरण वाघ यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.”मी तृतीयपंथी असल्याचा मला अभिमान आहे. शिक्षणामुळे मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.’ प्रत्येक तृतीयपंथीयाने शिक्षण घेऊन स्वतःचे अधिकार स्वतः मिळवले पाहिजेत,” असे त्यांनी सांगितले.

समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना मानसिक व सामाजिक समुपदेशन,रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन,शासकीय योजनांची माहिती,कागदपत्रे मिळवण्यासाठी मदत,शिक्षण व स्वावलंबनासाठी मार्गदर्शन,समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजक आसिफ शेख आणि अर्चना मेंगडे यांनी दिली.

या या कार्यक्रमाला माधुरी वैरागे, उपेन्द्र धाकपाडे, अवनी, अक्षय, मनस्वी, संघप्पा आदी बहुसंख्य तृतपंथीय उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button