भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Ajinkya Rahane Retirement | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. “मी देशासाठी सर्वतोपरी योगदान दिले आणि नेहमीच सच्चेपणाने खेळलो. भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली पर्वाचा मला भाग होता आले, याचा मला सार्थ अभिमान आणि समाधान आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
डोंबिवली ते मुंबई असा लोकल ट्रेनने प्रवास करत क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अजिंक्यने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खोऱ्याने धावा ओढत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. सुरुवातीच्या काळात अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमुळे त्याला दीर्घकाळ राखीव बाकावर बसावे लागले, मात्र संधी मिळताच त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवून दिली. भारतीय कसोटी संघात मधल्या फळीतील सर्वात विश्वासू फलंदाज म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली.
हेही वाचा
View this post on Instagram
अजिंक्यने भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय (ODI) आणि २० ट्वेन्टी-२० (T20) सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. विशेषतः, २०२०-२१ च्या ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्यच्या शांत, संयमी आणि प्रभावी नेतृत्वाखालीच भारतीय संघाने गाबा कसोटी जिंकून ‘बॉर्डर-गावस्कर चषक’ उंचावला होता.
आपल्या निवृत्तीच्या संदेशात अजिंक्य म्हणाला, “त्या लहान मुलाचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले. माझ्या या प्रवासात मुंबई क्रिकेट, बीसीसीआय, माझे कुटुंब, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे मोलाचे योगदान राहिले. बॅटिंग करताना मी जसे टायमिंगला महत्त्व दिले, तसेच आयुष्यातही प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. माझ्यासाठी हा निर्णय सोपा नव्हता, पण थांबण्याची हीच योग्य वेळ आहे.”





